माकडतापामुळे गावे दहशतीखाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

तीव्रता वाढतेय - माकडाच्या झुंडीच्या झुंडी मरून पडू लागल्याने अस्वस्थता

कोलझर - माकडताप परतल्याने पंचक्रोशीसह दोडामार्ग आणि बांद्यापर्यंतचा भाग दहशतीखाली आहे. ठिकठिकाणी माकडे मरून पडू लागल्याने लोकांचा उद्वेग वाढत आहे. आरोग्य विभागापेक्षा वनविभागाबद्दलचा असंतोष गावोगाव खदखदत आहे. यंदा माकडतापाची जोखीमग्रस्त गावे वाढल्यामुळे लोक असुरक्षिततेची भावना अनुभवत आहेत.

तीव्रता वाढतेय - माकडाच्या झुंडीच्या झुंडी मरून पडू लागल्याने अस्वस्थता

कोलझर - माकडताप परतल्याने पंचक्रोशीसह दोडामार्ग आणि बांद्यापर्यंतचा भाग दहशतीखाली आहे. ठिकठिकाणी माकडे मरून पडू लागल्याने लोकांचा उद्वेग वाढत आहे. आरोग्य विभागापेक्षा वनविभागाबद्दलचा असंतोष गावोगाव खदखदत आहे. यंदा माकडतापाची जोखीमग्रस्त गावे वाढल्यामुळे लोक असुरक्षिततेची भावना अनुभवत आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पहिल्यांदाच माकडतापाचा प्रादुर्भाव जाणवला. केर (ता. दोडामार्ग) येथून या साथीची जिल्ह्यात सुरवात झाली. पावसाळा सुरू होईपर्यंत याची तीव्रता कायम होती. गेल्यावर्षी सात जणांना या आजाराने मृत्यूच्या दाढेत ढकलले. आरोग्य विभागाने अलीकडेच यावर प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली. त्यामुळे माकडताप परतणार नाही, अशी भावना लोकांमध्ये होती; पण ती फोल ठरली. गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा अधिक तीव्रतेने माकडतापाने डोके वर काढले आहे. एकट्या दोडामार्ग तालुक्‍यात सध्या माकडतापाचे नऊ रुग्ण उपचार घेत आहेत.

जवळपास ९५ रक्तनमुने तपासण्यात आले आहेत. यातच या वेळी माकडतापाच्या जोखीमग्रस्त गावांमध्ये पहिल्या महिन्याभरातच वाढ झाली आहे. यात दोडामार्गमधील कुडासे, बांबर्डे आणि सावंतवाडी तालुक्‍यातील बांदा, नेतर्डे या गावांचा समावेश झाला आहे. बांदा परिसरातही चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

आरोग्यदृष्ट्या ही स्थिती असली तरी ग्रामीण भागात भीतीचे प्रचंड मोठे सावट पसरले आहे. गावठणामध्ये माकडाच्या झुंडीच्या झुंडी मरून पडत आहेत. माकडाच्या अंगावरील दूषित पिसवामुळे हा आजार होत असल्याने लहान मुले, शेतकरी यांना प्रादुर्भावाची भीती लोकांना वाटत आहे. माकड मेल्यानंतर त्वरित त्याची विल्हेवाट लावावी, अशी लोकांची वनविभागाकडून अपेक्षा आहे. त्याची पूर्तता होत नसल्याने लोकांमध्ये दहशतीबरोबरच असंतोष खदखदतो आहे. याबाबत कोलझर येथील सामाजिक कार्यकर्ते आपा देसाई म्हणाले, ‘‘लोकांचा वावर असलेल्या परिसरात माकडे मरून पडत आहेत. वनविभागाला कळविल्यानंतर लोकांनीच त्यांना विष किंवा अन्य मार्गाने मारले असावे अशी उत्तरेसुद्धा मिळत आहेत. लहान मुले, येथील सर्वसामान्य महिला, शेतकरी यांच्या जाण्या-येण्याच्या वाटेवर अशी माकडे मरून पडू लागल्याने भीती आहे. वनविभागाने याची त्वरित दखल घेऊन माकडताप जोखिमग्रस्त भागात स्वतंत्र यंत्रणा उभारावी. अशा माकडांबाबत आणि त्यांच्या विल्हेवाटीबाबत निर्णय घ्यावेत.’’

येथील पोलिसपाटील सुदेश देसाई म्हणाले, ‘‘परिसरात बरीच गावे माकडताप जोखिमग्रस्त आहेत. आरोग्य विभाग आपल्या परीने स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकांमध्ये मात्र भीती आहे. ती दूर करण्यासाठी उपाय योजायला हवेत.’’

दोडामार्गचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर म्हणाले, ‘‘यंदा रुग्णसंख्या वाढली किंवा माकडांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असा निष्कर्ष आताच काढणे थोडे धाडसाचे ठरेल. आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम राबविली. त्याचे चांगले परिणाम दिसण्याची शक्‍यता आहे.

गेल्यावेळी केरपासून रुग्ण मिळायला सुरवात झाली होती. यंदा याचा ट्रेंड थोडा बदललेला दिसतो. केरमध्ये अद्याप रुग्ण मिळालेला नाही. लोकांमध्ये या आजाराबात जागृती झाली आहे. यामुळे माकडाच्या मृत्यूकडे लोक जास्त लक्ष ठेवून असतात. माकडतापाच्या प्रादुर्भावात सर्वसाधारण स्थितीमध्ये एकाच ठिकाणी जास्त माकडांचा मृत्यू झाल्याची लक्षणे दिसतात.

आम्हालाही माकड मृत्यू झाल्याचे अनेक फोन येत आहेत. याचा प्रादुर्भाव पावसाळ्यापर्यंत राहणार आहे. आरोग्य विभाग शक्‍य तितके सर्व प्रयत्न करत आहे. लोकांचीही चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे या संकटावर आम्ही नक्की मात करू शकू.’’
 

घाबरून न जाण्याचे आवाहन
माकडतापाविषयी लोकांमध्ये जागृती होत आहे. हा आजार टाळण्यासाठी शेतावर किंवा जंगलात जाताना अंगावर डीएमटी ऑईल वापरावे. ताप अंगावर काढू नये. लगेच रुग्णालयात जावे, जेणेकरून रिस्क कमी होईल. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डॉ. चिपळूणकर यांनी केले.
 

गेल्यावर्षी माकडतापाने सात जणांचा मृत्यू झाला. यातील ७० ते ७५ टक्के रुग्ण केवळ माकडतापाचे नव्हे तर इतर आजारानेही त्रस्त होते. मात्र गेल्या वेळी ११६ पॉझिटिव्ह रुग्णांना वाचविण्यात यश आले हेही लक्षात घ्यायला हवे. लोकांची चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
- डॉ. तुषार चिपळूणकर, दोडामार्ग तालुका वैद्यकीय अधिकारी

Web Title: monkey flu