माकडताप नियंत्रणासाठी युनिटचा प्रस्ताव - उदय चौधरी

माकडताप नियंत्रणासाठी युनिटचा प्रस्ताव - उदय चौधरी

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा माकडतापाच्या नियंत्रणासाठी सतर्क आहे. अहोरात्र मेहनत घेत आहे; मात्र माकड तापाबाबत यंत्रणेला पूर्ण माहिती नसल्याने गोवा, शिमोगा येथून मिळणाऱ्या निर्देशानुसार सेवा दिली जात आहे. या तापाची मूळ कारणे शोधण्याची गरज आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायमस्वरूपी माकडतापाच्या संशोधन व उपाययोजनेसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचे युनिट स्थापन करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.

आज जिल्हास्तरीय लोकशाही दिन झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी माहिती दिली. या वेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी पोलिस उपअधीक्षक संध्या गावडे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ‘‘आजच्या लोकशाही दिनात एकूण ८ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांवर चर्चा करून संबंधित विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले. दोन अर्ज सार्वजनिक समस्यांबाबत असल्याने ते निकाली काढण्यात आले. जिल्ह्यात कॅशनूर डिसीज (माकडताप) या साथीने दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्‍यातील काही भागात प्रवेश केला आहे. या साथीच्या प्रादुर्भावाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून सेवा देत आहे. या साथीबाबत गेल्या महिन्यात संयुक्त बैठक झाली. त्यावेळी सर्व विभागांना व आरोग्य यंत्रणेला खबरदारीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आरोग्य यंत्रणा जातीनिशी सेवा देत आहे; परंतु येथील आरोग्य यंत्रणेला माकडतापाच्या साथीबाबत अद्याप परिपूर्ण माहिती नाही. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा गोवा व शिमोगा येथील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या निर्देशानुसार सेवा देत आहे; परंतु माकडतापाची कारणे शोधणे गरजेचे आहे.

त्याचे संशोधन करून त्यावर उपाययोजना झाल्यास या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल. त्यासाठी राज्य शासनाकडे गोवा, शिमोगाच्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यात माकडतापाबाबतचे स्वतंत्र युनिट कायमस्वरूपी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याला शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. जिल्ह्यात स्वतंत्र युनिट स्थापन झाल्यावर या माकडतापावर संशोधन करणे, तत्काळ उपाययोजना करणे शक्‍य होणार आहे; मात्र तोपर्यंत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा माकडतापाच्या नियंत्रणासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. तरीही जिल्ह्यात माकडतापाचे दोन बळी गेले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत दोन्ही मृत पावलेल्या व्यक्तींना अन्य आजार असल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होती. त्यातच माकडतापाचे बळी ठरल्याने उपचार करूनही यश मिळाले नसल्याची बाब समोर आली. माकडतापाच्या नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच तेथील लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे. या साथीमुळे सुमारे दोनशे कुटुंबे बाधित क्षेत्रात येत आहेत. त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे.

आरोग्य यंत्रणा आतापर्यंत कोठेही कमी पडलेली नाही; परंतु केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहारा ठेवून उपयोगाचे नाही तर तत्काळ उपाययोजनेसाठी सतर्क राहून इलाज केला पाहिजे. तापाचे मूळ शोधून काढले पाहिजे.’’

सी वर्ल्डसाठी मोजणी पूर्ण
जिल्ह्यात होऊ घातलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पासाठी जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी जी परिस्थिती होती त्यानुसार निवाड्याची प्रक्रिया सुरू आहे. निवाड्याचे काम पूर्ण होताच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे (एमटीडीसी) अहवाल सादर केला जाईल. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.

प्राधिकरणातील जमिनीची मोजणी
प्राधिकरण क्षेत्रातील जमिनीच्या मोजणीचे काम हाती घेतले आहे. अनेक संस्था, सोसायट्या व अन्य व्यक्तींनी जमिनी घेतल्यापासून त्याचा वापर केलेला नाही. जमिनी विकसित केलेल्या नाहीत. त्यांना गेल्या २० वर्षांत सात-बारा दिलेले नाहीत. त्यामुळे प्राधिकरण क्षेत्रातील जमिनीची मोजणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना ऑनलाइन सात-बारा वितरित करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती या वेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली.

सात-बारा संगणकीकरणात सिंधुदुर्ग मागे
राज्यभरात सात-बारा संगणकीकरणात काम सुरू आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्हा या कामात राज्यात सर्वात शेवटी आहे. ही वस्तुस्थिती आहे; परंतु या मागची कारणेही तशीच आहेत. जिल्ह्यातील तलाठ्यांकडे अन्य जिल्ह्यांतील तलाठ्यांपेक्षा दहापटीने कामाचा लोड जादा आहे. येथे सात-बाराची संख्या सर्वाधिक आहे. येथे सामाईक सात-बारा जादा आहेत. एका सात-बारावर २५ ते ३० जणांची नावे आहेत. आणेवारी व पैसेवारी ज्याप्रमाणे सात-बारावर आहे ती तशीच्या तशी ऑनलाइन सातबारावर घेणे आवश्‍यक आहे. अशा अनेक अडचणी असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा सात-बारा संगणकीकरणाच्या कामात राज्याच्या तुलनेत मागे आहे, ही वस्तुस्थिती आहे. यापुढे     ऑनलाइन सात-बारा कोणालाही देऊ नये असे निर्देश सर्व तलाठ्यांना देण्यात आले आहेत. सर्व तलाठी    कार्यालयांना ऑनलाइन सर्व्हर पुरविण्यात आला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी ऑनलाइन सात-बाराची कार्यवाही सुरू आहे; मात्र तलाठ्याचे काम चांगले असले तरी कामाचा व्याप जादा असल्याने थोडा विलंब होत असल्याची माहिती या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
 

प्राधिकरणाचे रस्ते पावसाळ्याआधी दुरुस्त
जिल्हा निर्मितीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील शासकीय इमारती, वसाहती, रस्ते, नळपाणी योजना अशा कामासाठी शासनाकडे ५ ते ६ कोटी निधीची मागणी प्रस्तावाद्वारे केली आहे. शासकीय इमारतींना गळती व येथील रस्त्यांची डागडुजी या निधीतून करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी प्राधिकरण क्षेत्रातील रस्ते व शासकीय इमारती, कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती या वेळी चौधरी यांनी दिली. नवनगर प्राधिकरण क्षेत्रातील विद्युत व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी आहेत. संबंधित ठेकेदारांकडून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात नाही. प्राधिकरण क्षेत्रातील सुमारे दोनशे विद्युत खांबांवर अद्याप लाइट नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्राधिकरण क्षेत्रातील विद्युत व्यवस्था पाहण्यासाठी एक वायरमन व मदतनीस अशा दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com