ऐन मे महिन्यात आंबोलीत पावसाचा 'फिल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

वातावरणात पावसाळ्यातील टिपिकल गारवा तयार झाला. रस्ते, झाडे ओलिचिंब झाली. यामुळे उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्यांना पावसाळ्याचीही अनुभूती आली. ऐन मे महिन्यात जाणवलेला हा गारवा पर्यटकच नाही तर स्थानिकांसाठीसुद्धा सुखावणारा ठरला.

आंबोली: मे महिन्याच्या मध्यावर आंबोलीत आज पावसाळ्याचा फिल आला. दाट धुके, दमदार पावसानंतर पसरलेला गारवा यामुळे उन्हाळी पर्यटन एन्जॉय करायला आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाची मजा घेता आली.

तळकोकणात गेल्या तीन-चार वर्षात वातावरणातील बदल अधिक प्रखरतेने जाणवू लागले आहेत. अगदी ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारुपास आलेली आंबोलीही यातून सुटलेली नाही. राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले आंबोलीत उन्हाळ्यात अपेक्षित गारवा थोडा कमी होताना जाणवत आहे. येथे पर्यटन तसे बारमाही चालते. मात्र सर्वाधिक गर्दी पावसाळ्यात होते. त्यामुळे वर्षा पर्यटन कधी सुरू होणार याचे वेध पूर्ण राज्याला लागलेले असतात.

सध्या उन्हाळी पर्यटनासाठी येथे येणार्‍यांची संख्या तशी मर्यादित आहे. आज पहाटे या भागात दमदार पाऊस झाला. सोबत विजांचा लखलखाटही होता. यामुळे पूर्ण आंबोली चिंब झाली. याचा परिणाम वातावरणात लगेचच जाणवला. पावसाळ्यात असते तशी धुक्याची दाट चादर पूर्ण आंबोलीभोवती लपेटली गेली.

वातावरणात पावसाळ्यातील टिपिकल गारवा तयार झाला. रस्ते, झाडे ओलिचिंब झाली. यामुळे उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्यांना पावसाळ्याचीही अनुभूती आली. ऐन मे महिन्यात जाणवलेला हा गारवा पर्यटकच नाही तर स्थानिकांसाठीसुद्धा सुखावणारा ठरला.

अंदमानमध्ये माॅन्सून दाखल झाला आहे. शिवाय जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अधूनमधून वर्षावृष्टी सुरू आहे. हे वर्षा पर्यटनाचे वेध आंबोलीला सुखावणारे ठरत आहेत. इथल्या पर्यटन व्यावसायिकांनीही वर्षा पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक तयारी सुरू केली आहे.

Web Title: Monsoon feel in Amboli ghat; Rain lashes out Kokan

फोटो गॅलरी