देवगडमध्ये वर्षा पर्यटन बहरले

देवगडमध्ये वर्षा पर्यटन बहरले

देवगड - अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्‍यात वर्षा पर्यटन बहरले आहे. धबधब्यांसह ठिकठिकाणचे पाणवठे स्थानिकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. तालुक्‍यात सोयीची विविध धबधब्याची ठिकाणे शोधून काढली जात असून पावसाळी आनंद घेण्यावर भर आहे. यामध्ये तरूणाईसह महिलांचाही उत्साह दांडगा असल्याचे दिसत आहे. 

श्रावणसरी बरसण्यास आता काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे श्रावणात मांसाहार टाळणारी मंडळी सध्या धबधब्याकडे विशेष आकर्षिली जात आहे. साधारणतः ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने त्या आधी पावसाळी मौजमजा उरकण्याकडे कल आहे. काही मंडळी धबधबा, पाणवठ्याची ठिकाणी जेवण करतात. अशावेळी मांसाहारी जेवणाचा बेत अधिक असतो. त्यामुळे अशा मंडळीची सध्या लगबग वाढलेली दिसत आहे.

तालुक्‍यातील तळेबाजारजवळील तळवडे नाव्हणकोंड येथील धबधबा सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. रस्त्यालगत असलेला हा धबधबा सर्वांच्या सोयीचा भासत आहे. पाण्याच्या दृष्टीने फार खोल नसल्याने मनसोक्‍त मजा घेता येते. महिला, लहान मुले यांनाही याचा मनमुराद आनंद घेण्याजोगे ठिकाण आहे. अलिकडे पूर्ण क्षमतेने धबधबा वाहत असल्याने तरूणाची रोजच धबधब्यावर गर्दी होताना दिसत आहे.

महिलाही आपल्या समुहासह धबधब्याचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. फेसाळणारे पाणी अंगावर घेण्याची मजा लुटण्यासाठी अनेकजण आतुर असतात. स्थानिकांबरोबरच पर्यटकही या ठिकाणला आवर्जुन भेट देताना दिसत आहेत. पर्यटनदृष्ट्या धबधब्याच्या ठिकाणचा काही प्रमाणात विकास करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील मणचे येथील धबधब्यावरही गर्दी होताना दिसत आहे. तालुक्‍यात अन्य काही ठिकाणी नवीन धबधब्याची ठिकाणे तरूणाईने शोधून काढली असली तरी त्याचा पर्यटनात्मक विकास होणे बाकी आहे. 

सुविधांची आवश्‍यकता
तालुक्‍यातील धबधबे पर्यटकांना खुणावत असले तरी काही सोयींची उणिवा जाणवत आहेत. तळवडे येथील धबधब्याच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजींग रूम, जेवण करण्यासाठी सोयीची व्यवस्था, पाण्यात न उतरणाऱ्यांसाठी पावसापासून सुरक्षित जागा निर्माण करण्याची आवश्‍यकता व्यक्‍त केली जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com