सुधागडमध्ये संपन्न झाला पावसाळी रानभाज्या महोत्सव

konkan
konkan

पाली- पावसाळ्यात माळराण, शेतात व जंगलात अनेक वनस्पती उगवतात. यातील काहींचा आपण रानभाज्या म्हणून वापर करतो. आरोग्यासाठी पूरक असलेल्या रानभाज्यांची शास्त्रशुद्ध माहीती मिळावी त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी उद्धर येथील सेंद्रिय शेती करणारे व इको-आर्किटेक्ट तुषार केळकर यांनी नुकताच रानभाज्या महोत्सव भरविला होता.

निसर्ग नेहमीच प्रत्येक ऋतुत सढळ हस्ते काही न् काही देत असतो. पावसाळ्यात रानावनात उगवणार्‍या रानभाज्या या निसर्गराजाचीच कमाल आहे ! या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात कारण त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व व खनिजद्रव्य असतात. सोबतच पावसाळी मोसमात आपल्या शरीराला आवश्यक औषधी गुणधर्मही त्यात सामावलेली असतात. मात्र यासाठी या वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग याबाबतची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ती असते. ते पारंपरिक पद्धतीने अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात. मात्र सर्वसामान्यांना याची माहिती नसते.  म्हणूनच पावसाळी रानभाज्यांचा महोउत्सव उद्धर येथील निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्यात आला होता.यावेळी उपस्थितांनी वनस्पतीशास्राचे अभ्यासक गणेश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली रानात फिरून विविध रानभाज्या वेचल्या.  शेवळं, टाकळा, कुर्डू, शेंडवळ, अळू, खरसुंडीच्या शेंगा, भारंगी, कर्टुले, फोडशी,  काकडं, भोंड्याची भाजी अशा विविध रानभाज्यांचा यात समावेश होता. गणेश दिघेंनी रानभाज्यांची रोचक व चविष्ट माहीती सांगितली. नंतर सर्व उपस्थितांनी दुपारच्या जेवणाला या रानभाज्या पारंपारिक पध्दतीने बनवून त्याचा भरपेट आस्वादही घेतला. यातील बरीचशी मंडळी घराकडे परततांना हा रानभाज्यांचा मेवा सोबत घेऊन गेली. या बरोबरच सहभागी झालेल्यांना उद्धर गावातल्या खळखळणार्‍या धबधब्यात,  नदित मनसोक्त जलविहार, चुलीवरचं गरमागरम जेवण, निसर्गसफरीचा आनंद अनुभवण्यास मिळाला.

पुन्हा संधी
हा रानभाज्या महोत्सव सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा खास लोकाग्रहास्तव २१ व २२ जुलैला आयोजित केला जाणार आहे. 
संपर्क तुषार केळकर ०९५४५६७५८७१

कधी न पाहिलेल्या रानभाज्यांची ओळख झाली व शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. तसेच त्यांचा आस्वाद देखिल घेता आला. हा अनुभव अविस्मरणीय होता.
संतोष खामगावकर, कांदिवली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com