आणखी दीड हजारांवर मतदान यंत्राची गरज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

जिल्ह्यात 838 मतदान केंद्र निश्‍चित 
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 838 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून तेथे मतदान प्रक्रियेचे काम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण 28 जानेवारीला तालुकास्तरावर झाले असून उर्वरित प्रशिक्षण 9 व 10 फेब्रुवारीला होणार आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ता. 21 ला मतदान आहे. त्यासाठी जिल्ह्यात 2600 मतदान यंत्राची आवश्‍यकता आहे. जिल्हा प्रशासनाकडे सध्या 1090 मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. उर्वरित 1510 मतदान यंत्रे बीड जिल्ह्यातून मागविण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात ती उपलब्ध होतील. जिल्ह्यातील मतदान केंद्राची यादी ता. 15 ला जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे यांनी आज दिली. 

आणखी 1510 यंत्राची आवश्‍यकता असून त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधण्यात आले होते. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली. बीड जिल्ह्यातून 1510 मतदान यंत्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येत मतदाराला अनुक्रमे एक-एक मत देण्याचा अधिकार असणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेसाठी एक व पंचायत समितीसाठी एक अशी स्वतंत्र दोन मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील मतदारांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून जिल्ह्यात 5 लाख 63 हजार 631 मतदार आहेत. या सर्वांची यादी 14 फेब्रुवारीला मतदान केंद्रनिहाय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी खाडे यांनी दिली. 

आचारसंहिता भंगाची तक्रार नाही 
राज्य निवडणूक आयोगाने 18 जानेवारीपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. त्यापासून आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा कार्यकर्त्याकडून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात एक या प्रमाणे 8 आणि जिल्हास्तरावर एक अशी एकूण नऊ नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत. या कक्षातून आचारसंहिता भंग होऊ नये, या बाबत खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती प्रवीण खाडे यांनी दिली. 

जिल्ह्यात 838 मतदान केंद्र निश्‍चित 
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 838 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून तेथे मतदान प्रक्रियेचे काम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण 28 जानेवारीला तालुकास्तरावर झाले असून उर्वरित प्रशिक्षण 9 व 10 फेब्रुवारीला होणार आहे.

Web Title: more EVM machine needs in sindhudurg district