भारतरत्न काणेंच्या स्मारकासाठी चळवळ

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 1 मार्च 2019

भारतरत्न पांडुरंग काणे हे आपल्या जिल्ह्याचे भूषण आहेत. त्यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने जपल्या जातील. शासनाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे. काणे यांचे चुलत नातू विलास काणे यांनी स्मारक उभारणीस आमची कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
- प्रशांत परांजपे, कोमसाप जिल्हाध्यक्ष.

रत्नागिरी - खेड तालुक्‍यातील मुरडे येथील भारतरत्न पांडुरंग वामन काणे यांच्या मूळ घराची दुरवस्था झाली आहे. या घराचे राष्ट्रीय स्मारक व्हावे व ते साहित्यिक, तरुणांना प्रेरणादायी ठरावे याकरिता कोकण मराठी साहित्य परिषदेने चळवळ उभी केली आहे. सरपंच, ग्रामस्थांनीही याकरिता मदतीचे आश्‍वासन दिले आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याने ५ भारतरत्न दिले. त्यातीलच एक पां. वा. काणे. भारत सरकारने महामहोपाध्याय या पदवीने त्यांना गौरवले. साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. लंडन, पॅरीस, इस्तंबुल येथे त्यांच्या सभा गाजल्या. त्यांचे मुरडे येथे घर आहे, याची अनेकांना माहितीच नाही. स्मारकासंदर्भात कोमसापच्या खेड शाखेने काणे यांच्या निवासस्थानी उपाध्यक्ष गोविंद राठोड, कोषाध्यक्ष विमलकुमार जैन, महिला आघाडीप्रमुख रेखा जेगरकल, युयुत्सु आर्ते, प्रमोद हर्डीकर, सरपंच, विलास काणे, ग्रामस्थांची बैठक घेतली.

स्मारक बनेल साहित्य पर्यटनाचे केंद्र
स्मारकाच्या माध्यमातून पां. वा. काणे यांच्या स्मृतीग्रंथांचे आणि साहित्याचे स्वतंत्र दालन, अभ्यासिका, साहित्य सेवकांसाठी अद्ययावत सभागृह, चरित्र ग्रंथांचे प्रदर्शन, कोकणातील साहित्यिकांचा परिचय देणारे स्वतंत्र दालन, नैसर्गिक वाचन मंदिर, निवास व्यवस्था, संगणकीय प्रणाली, इंटरनेट सुविधा देण्याचा मानस आहे. त्यातून हे स्मारक साहित्य पर्यटनाचे केंद्र बनेल. शासनाने स्मारक उभारणीस हातभार लावावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भारतरत्न पांडुरंग काणे हे आपल्या जिल्ह्याचे भूषण आहेत. त्यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने जपल्या जातील. शासनाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे. काणे यांचे चुलत नातू विलास काणे यांनी स्मारक उभारणीस आमची कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
- प्रशांत परांजपे, कोमसाप जिल्हाध्यक्ष.

काणे यांचे हे २५० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक घर असून स्मारकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थानिकांच्या मदतीला कोमसाप आहे. नजीकच्या कालावधीत हे स्मारक होईल.
- युयूत्सू आर्ते

 

Web Title: Movement for Monument of Bharatratna Pandurang Kane