सरसकट भरपाईसाठी सावंतवाडीत धरणे 

रुपेश हिराप
Wednesday, 21 October 2020

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जंगले यांनी केली. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी जंगले यांनी केली. 

येथील प्रांत कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी जंगले, तालुकाप्रमुख संजय गावडे, उपशहर प्रमुख प्रकाश देसाई, सोनू खरवत, महादेव कोळेकर, गंगाराम खरवत, बाबू झोरे, धाकू जंगले, दत्ताराम जंगले आदी उपस्थित होते. 

जिल्हाध्यक्ष जंगले म्हणाले, ""राज्यात अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे तसेच शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकूणच शेतकऱ्यावर ओढवलेली ही परिस्थिती लक्षात घेता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी. रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. 

गतवर्षीची भरपाईही द्या 
सिधुदुर्ग जिल्ह्यात गतवर्षी नुकसानभरपाई झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानीची रक्कम प्राप्त झालेले नाही. त्यामुळे आधी गतवर्षीची नुकसान भरपाई तात्काळ द्या, अशी मागणी जंगले यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सुपूर्द केले. या धरणे या आंदोलनाला शेतकरी नेते मंगेश तळवणेकर यांनीही पाठिंबा दर्शवला.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement at Sawantwadi