संगमेश्‍वर आयटीआयच्या स्थलांतराबाबत हालचाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

देवरूख - संगमेश्‍वरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कामकाज भाड्याच्या जागेतून स्वमालकीच्या जागेत हलविण्यासाठी येथील संघर्ष समितीने जोरात हालचाली सुरू केल्या. त्यामुळे या स्थलांतराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः आयटीआय प्रशासन, संघर्ष समिती आणि बांधकाम विभाग यांची येत्या आठ दिवसांत संयुक्‍त बैठक घेणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे गणेश चाचे यांनी दिली.

बैठकीनंतरही नवीन सत्र नव्या इमारतीत न सुरू झाल्यास गांधीगिरी करून जुन्या इमारतीतील कामकाज बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संघर्ष समितीने पाठपुरावा केल्यानंतर बांधकाम विभागाने इमारतीसाठी आवश्‍यक असलेली रस्ता, वीज, पाण्याची सर्व कामे पूर्ण झाल्याचे लेखी पत्र संघर्ष समितीला दिले होते. हे पत्र घेऊन समितीने आयटीआय प्रशासनाशी संपर्क साधला असता संघर्ष समितीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. इमारतीची १०० टक्‍के कामे झाल्याशिवाय आम्ही इमारत ताब्यात घेणार नाही, असे सांगण्यात आले होते. संघर्ष समितीने प्रभारी प्राचार्य गायकवाड यांना धारेवर धरले होते. यानंतर मंगळवारी संध्याकाळी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची भेट घेत त्यांना या प्रश्‍नात लक्ष घालण्याची विनंती केली. समितीचे निवेदन स्वीकारून त्यांनी वस्तुस्थिती ऐकून घेतली.
 
तसेच आयटीआय प्रशासनाकडून कशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, याचे व्हिडिओ चित्रण त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. प्रश्‍न गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी आठ दिवसांत संघर्ष समिती, आयटीआय प्रशासन आणि बांधकाम विभागाची संयुक्‍त बैठक घेण्याचे आणि यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन समितीला दिल्याचे चाचे यांनी सांगितले. 
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊनही आयटीआयचे कामकाज नव्या इमारतीत सुरू झाले नाही, तर समिती गांधीगिरी मार्गाने जुन्या इमारतीतील कामकाज बंद पाडेल असा इशारा त्यांनी दिला आहे. सध्या ज्या भाड्याच्या इमारतीत आयटीआयचे कामकाज चालते ती जागा पुनर्वसनाची आहे. इथे भाडेकरू ठेवता येत नाही. जागामालकाने आयटीआयकडे यापूर्वीच ही जागा खाली करून मागितली आहे. तरीही प्रशासन ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने यात पाणी मुरत असल्याचा आरोप चाचे यांनी केला आहे.

Web Title: Movement with the shift of Sangameshwar ITI