आम्ही भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबतच - राणे

आम्ही भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबतच - राणे

कणकवली  - रत्नागिरी सिंधुदुर्गसह राज्यातील इतर मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. मात्र आम्ही भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबतच आहोत. एनडीएमधील आम्ही घटक पक्ष आहोत, अशी स्पष्टोक्ती खासदार नारायण राणे यांनी दिली.  

येथील प्रहार भवन येथे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यांच्यासमवेत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. 

श्री. राणे म्हणाले, रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी खासदार निलेश राणे यांची उमेदवारी महाराष्ट्र स्वाभिमान तर्फे आम्ही जाहीर केली आहे. त्यांना भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी आम्ही संपर्क साधणार आहे. 

श्री राणे म्हणाले राज्यात शिवसेना आणि भाजप या पक्षातील फक्त नेत्यांमध्ये युती झालेली आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे येथे शिवसेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपचे कार्यकर्ते विरोधात मतदान करतील तर जेथे भाजपचा उमेदवार असेल तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते विरोधात मतदान करतील. याचा निश्‍चितपणे फायदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसह काँग्रेस - राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असले तरी आम्ही मोदींसोबत आहोत. लोकसभा निवडणुकीनंतर देखील मोदींनाच आमचा पाठिंबा असणार आहे. इतर गटबंधन मध्ये सहभागी होण्याचा आमचा विचार नाही. 

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निवडणूक लढण्याचा विचार व्यक्त केला आहे. या प्रश्नावर बोलताना श्री राणे यांनी श्री जठार यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ते लोकसभा निवडणूक लढणार असतील तर ते भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार का? असाही प्रश्न उपस्थित केला. तसेच लोकसभा निवडणुकी सोबत विधानसभा निवडणूक होण्याची सुतराम शक्‍यता नाही असेही ते म्हणाले. 

नाणार प्रकल्प समर्थनार्थ 14 गावांमध्ये मेळावे होत आहेत. या प्रश्नावर बोलताना श्री राणे म्हणाले समर्थन कुणीही करोत मात्र आमचा नाणार प्रकल्पाला कायमच विरोध राहणार आहे. नाणार समर्थनार्थ मोर्चा काढणारी मंडळी ही जमीनमालकांची दलाल आहेत असा आरोपही श्री. राणे यांनी केला. 

नाणार प्रकल्पावरून शिवसेना तोंडघशी पडली आहे. भूसंपादन प्रक्रिया ते प्रकल्पाला लागणाऱ्या सर्व परवानग्या ह्या शिवसेनेनेच दिलेल्या आहेत. नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, असे श्री राणे म्हणाले. 

राज्यात जेथे जेथे शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आणि आमदार आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अधोगती सुरू आहे. सर्व विकास ठप्प आहे, अशीही टीका श्री राणे यांनी केली. भाजपचा जाहिरनामा समितीमध्ये मी असलो तरी माझा स्वतःचा वेगळा पक्ष आहे याची कल्पना भाजप नेत्यांना नसावी. माझा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com