लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठीच शिवसेनेचे भाजपशी भांडण

लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठीच शिवसेनेचे भाजपशी भांडण

रत्नागिरी - सत्तेचा स्वार्थासाठी गेली पाच वर्षे शिवसेना भाजपशी भांडत राहीली, जनतेची दिशाभूल करत राहीली. कोणतीही विकास कामे केली नाहीत, कोणताही प्रकल्प आणला नसल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ते आपसात भांडत होते. जशी निवडणूक जाहीर झाली, तशी त्यांनी युती केली आणि गळ्यात गळे घालून फिरुन चांगले बोलू लागले, अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी शिवसेना-भाजप युतीचा समाचार घेतला. तसेच मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला, यावेळी घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रत्नागिरीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अफझलखनची उपमा देत खालच्या पातळीवरुन जाऊन टीका केली. तेच आता शहा यांचा अर्ज भरण्यासाठी गांधीनगर येथे उपस्थित होते. सत्तेच्या स्वार्थासाठी, पैशासाठी शरणागती पत्करत शिवसेनेने युती केली. आम्हाला कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प नकोत. पण पर्यावरणपूरक टेकस्टाईक, ऑटोमोबाईल प्रकल्प आणू. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि चिपी विमानतळाचे श्रेय शिवसेनेचे नाही. चौपदरीकरणाचा प्रस्ताव काँग्रेस सरकारच्या काळात मी मंजूर करुन आणला. त्याला नितीन गडकरी यांनी फंड दिला आणि निविदा प्रक्रियेची कार्यवाही केली. यात शिवसेनेचा काहीच हात नाही. फक्त श्रेयासाठी ते बागुलबुवा उभा करीत आहेत. लोटेतील केमिकल कंपनीत 400 पैकी केवळ 40 कामगार कायम आहेत. उर्वरित 360 कामगार कंत्राटी असून त्याची कंत्राट शिवसेनेकडे आहेत. या कंपनीच्या मालकांना शिवसेनेचा वरदहस्त असून रामदास कदमांच्या आशीर्वादाने सर्वकाही सुरु आहे.

काँग्रेसचे उमेदवार बांदीवडेकर यांनी केलेले आरोप खोडून काढत आम्हाला षडयंत्र करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले. दिपक केसरकरांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले केसरकरांना राजकारण कळत नाही. मी राजीनामा देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे सांगत राऊत, केसरकर यांच्या टिकेची दखल घेत नाही. स्वयंरोजगार, महिलांना उद्योग या दोन गोष्टींवर भर देणार असून सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. नीलेश राणे खासदार झाल्यानंतर रत्नागिरीत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देऊ.

नीलेश राणे आज अर्ज भरणार

निलेश राणे एक एप्रिलला अर्ज भरणार आहेत. दोन्ही जिल्ह्यात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. त्यात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेला परिवर्तन हवे आहे, ते नक्कीच घडवेल. उमेदवारी भरताना सर्व मतदार नीलेश राणेंना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील, असा विश्‍वास राणेंनी व्यक्त केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com