कोणाच्या पोटात गोळा यावा म्हणून आत्मचरित्र लिहिलेले नाही - राणे

गुरुवार, 9 मे 2019

कोणाच्या पोटात गोळा यावा म्हणून आत्मचरित्र लिहिलेले नाही. तरुणांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी हे लेखन केले आहे. मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेऊन नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास केला. - नारायण राणे, माजी मुख्यमंत्री

मालवण - माझ्या आत्मचरित्राबाबत वैभव नाईक यांनी बोलू नये. तेवढी त्यांची पोच नाही. बोलायचेच असेल तर अभ्यास करून बोलावे. विधानसभेत चार वर्षांत त्यांना तोंड उघडता आले नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली. 

ते ‘सकाळ’शी आत्मचरित्राबाबत बोलत होते. या वेळी नाईक यांनी केलेल्या ट्‌विटच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘कोणाच्या पोटात गोळा यावा म्हणून आत्मचरित्र लिहिलेले नाही. तरुणांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी हे लेखन केले आहे. मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेऊन नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास केला. यातून तरुणांना बोध मिळावा, हा या मागचा हेतू होता.’’ ते म्हणाले, ‘‘यात वास्तव मांडले आहे. पुस्तकाचे सर्व संदर्भ आता सांगणार नाही. याचे प्रकाशन मुंबईत होईल. मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत. ते मुंबईत येतील तेव्हा प्रकाशनाची तारीख ठरेल.’’