कुडाळातील समस्यांप्रश्नी खासदारांनी ठेकेदाराला काय सुचना केल्यात?, वाचा...

MP Raut inspects highway work at Kudal sindhudurg
MP Raut inspects highway work at Kudal sindhudurg

कुडाळ (सिंधुदुर्ग) - उद्यमनगर येथील सर्कलचा प्रश्‍नही मार्गी लावला जाईल. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कुडाळ ते कणकवली दरम्यान ज्या-ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासह सेवा रस्त्यांची दुरूस्ती, नाले, पाण्याचे मार्ग मोकळे करणे, शेतात माती वाहून नुकसान होऊ नये, यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. 

कणकवली ते कुडाळ दरम्यान चौपदरीकरणाची अर्धवट असलेली कामेही जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री. राऊत म्हणाले. तालुक्‍यात अतिवृष्टीचा मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला फटका बसला आहे. ठिकठिकाणी सेवा व पर्यायी रस्ते खचले. अनेक ठिकाणी खड्ड्यांची समस्या निर्माण झाली.

महामार्गाचा भराव खचून लगतच्या भातशेतीत माती वाहून जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कामे अर्धवट असून पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना न केल्याने अनेक ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत व आमदार वैभव नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, क्‍वॉलिटी कंट्रोल विभाग व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत पावशी व कुडाळ येथे चौपदरीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. चौपदरीकरणांतर्गत समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. 

पावशी व कुडाळ येथे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर भंगसाळ नदीनजिक मायनर ब्रीजजवळ पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना न केल्याने पाण्याची समस्या निर्माण होत आहे. तेथे शेतीत माती जाऊन मोठे नुकसान झाले आहे. याकडे नगरसेवक सचिन काळप व राजन काळप यांनी खासदार राऊत व आमदार नाईक यांचे लक्ष वेधले.

तेथील सेवा रस्त्याच्या दुरवस्थेबाबतही लक्ष वेधण्यात आले असता खासदार राऊत व आमदार नाईक यांनी सेवा रस्त्याच्या दुरूस्तीसह पाण्याची समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. भातशेतीत माती वाहून जाऊ नये, यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजना करण्याच्याही सूचना केली. श्रीरामवाडी येथील चौपदरीकरणांतर्गत समस्या खासदार राऊत यांनी जाणून घेत त्या दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

दरम्यान, कुडाळ-उद्यामनगर येथील गटार व सांडपाण्याची समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही दिल्या. कुडाळ ते कणकवली दरम्यानच्या समस्या तातडीने दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने आवश्‍यक उपाययोजना करण्यात येतील, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, सचिन काळप, सुशील चिंदरकर, बाळा कोरगावकर, राजन नाईक, बाबी गुरव, नेक्‍स्ट ड्राईव्हचे येथील व्यवस्थापक सचिन राव, ठेकेदार कंपनीचे परिहार भोगटे, राजू जांभेकर, राजू गवंडे, सुयोग ढवण, कसाल येथे बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, गणेश मेस्त्री आदी उपस्थित होते. 

लवकरच सर्कल होणार 
शहरातील उद्यमनगर येथील आरएसएन हॉटेलसमोर महामार्गावर सर्कलची मागणी विविध संस्था तसेच नागरीकांमधून होत आहे. याबाबत हॉटेल व्यावसायिक राजन नाईक व निलेश तेंडुलकर यांनी खासदार राऊत व आमदार नाईक यांचे लक्ष वेधले. त्यावर खासदार राऊत यांनी या ठिकाणी ग्रामस्थांची मागणी विचारात घेऊन सर्कल करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, अशी सुचना क्‍वॉलिटी कंट्रोल विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. याठिकाणाहून चिपी विमानतळाकडे रस्ता जात असल्याने तेथे सर्कल गरजेचे असून त्यादृष्टीने निश्‍चितच हा सर्कलचा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिली. 

मार्गाची उंची वाढवण्याची मागणी 
टिव्हीएस शोरूम समोरील रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे परिसर जलमय होतो. रस्त्यालगत असणाऱ्या टिव्हीएस शोरूमनजीक भिंत कोसळली असून धोका उद्धभू शकतो. याकडे सचिन राव यांनी खासदार राऊत व आमदार नाईक यांचे लक्ष वेधले. 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com