सुखद बातमी! महिला हाॅस्पिटलप्रश्नी खासदार म्हणाले...

अजय सावंत | Tuesday, 28 July 2020

खासदार राऊत म्हणाले, ""जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त झालेला कुडाळचा खरेदी विक्री संघ आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील आरोग्य सुविधा भक्कम करणे हे आव्हान स्वीकारले आहे. येथील महिला हॉस्पिटल दोन महिन्यांत सुरू होणार आहे. पहिले व्हेंटिलेटर मशीन आज आले असून स्टाफ भरती सुरू झाली आहे, असे प्रतिपादन शिवसेना सचिव तथा लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आज केले. 

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कोरोनामुळे साध्या पद्धतीने सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांच्या सौजन्याने तालुका खरेदी-विक्री संघातील कर्मचाऱ्यांसाठी कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्य वाटप झाले. 

यावेळी जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, पावशी तालुका प्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, अभय शिरसाट, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट युवा सेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, निलेश तेंडुलकर, खरेदी विक्री संघ व्यवस्थापक नंदकिशोर करावडे, संतोष आंमडोसकर, बंड्या कोरगावकर आदी उपस्थित होते. 

खासदार राऊत म्हणाले, ""जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त झालेला कुडाळचा खरेदी विक्री संघ आहे. या जिल्ह्यात आरोग्य सुविधा सुरु करण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या महिना अखेरीस हॉस्पिटलचे उद्घाटन होत आहे. येथील महिला हॉस्पिटल हे दोन महिन्यात सुरू होईल. याठिकाणी मंजूर झालेल्या चार व्हेंटिलेटरपैकी आज एक व्हेंटिलेटर मशीन मंजूर झाले आहे. स्टाफ भरती सुरू झाली आहे. 3 वर्षात वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण होईल. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी उपलब्ध होईल. तीन टप्प्यात निधी देण्याची मागणी केली आहे. चक्राकर पद्धतीने डॉक्‍टर व नर्सेस भरती सुरु झाली.'' 

नागेंद्र परब म्हणाले, ""आम्ही येथील कर्मचारी यांच्या आरोग्य सेवेसाठी माणुसकीच्या भावनेतून साहित्य वाटप केले. कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम छोटेखानी घेण्यात आला.'' श्री. पडते, श्री. तेंडुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. करावडे यांनी आभार मानले. 

नागेंद्र परब यांचा उपक्रम कौतुकास्पद 
जिल्हा परिषद शिवसेना गटनेते परब यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासून तालुक्‍यात चांगला उपक्रम राबविला. ते आपल्या मतदार संघातही विकासात्मक वाटचाल करताना दिसत आहेत, असे खासदार राऊत यांनी सांगून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. 

संपादन - राहुल पाटील