‘स्वाभिमान’कडून दुहीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

सिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. मच्छीमारच त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्गनगरी - पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात स्वाभिमान पक्ष दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. मच्छीमारच त्यांना धडा शिकवतील, असेही ते म्हणाले.

येथील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. राऊत म्हणाले, ‘‘आपण महायुतीचे उमेदवार म्हणून ३० मार्चला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. या निवडणुकीत शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे.’’ 

ते म्हणाले, ‘‘आम्ही कधीही पारंपरिक मच्छीमार हा कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार केला नाही. त्यांना केंद्रबिंदू मानून मच्छीमारीची पॉलिसी ठरविण्यासाठी मी व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मिळून प्रयत्न केले. त्यामुळेच या विभागाचे स्वतंत्र मंत्रालय निर्माण झाले. स्वतंत्र मंत्री असावा, अशीही आमची आग्रही मागणी आहे. रत्नागिरी येथील काही पर्सनेट मच्छीमारी करणारे मच्छीमार आपल्याला भेटायला आले होते. त्यांना पर्सनेट मच्छीमारी कालावधी दोन महिने वाढवून मेपर्यंत हवा होता. त्यासाठी मी त्यांना घेऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटलो. त्यावेळी मी एलईडीने मच्छीमारीला विरोध दर्शविला. या प्रकारची मासेमारी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, तीन वर्षे शिक्षेची कायद्यात तरतूद करा, अशी मागणी केली होती. यावेळचा व्हिडिओ व्हायरल करीत स्वाभिमान पक्ष पारंपरिक मच्छीमार आणि आमच्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.’’

पारंपरिक मच्छीमार आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांच्या समस्या सोडविणे, त्यांना व्यवसायात स्थिर करणे हे आमचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आम्ही आमच्यावतीने पार पाडत आहोत. आमदार नाईक, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडूनही पारंपरिक मच्छीमारांच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मच्छीमार सेना-भाजप महायुतीच्या बाजूने मतदान करतील, असा विश्‍वास यावेळी श्री. राऊत यांनी व्यक्त केला.

मतदारांनी संभ्रमात राहू नये
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आमच्या विरोधी काही पोस्ट व्हायरल करून माझी बदनामी चालविली आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र मतदारांनी संभ्रमात पडू नये. शिवसेना-भाजप युतीचाच विजय 
निश्‍चित आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्याच पाठीशी ठामपणे उभे राहतील. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन निर्णय झाला आहे, असेही श्री. राऊत यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Vinayak Raut comment