'एकही शिवसैनिक भाजपात जाणार नाही'

सकाळ वृत्तसेवा | Friday, 6 November 2020

राणे फक्‍त वल्गनाच करत आले आहेत. त्यांच्या वक्‍तव्यांची आता आम्ही दखलच घेत नाही.

रत्नागिरी : कोकणातील शिवसेना संपवण्याचे नारायण राणे यांचे वक्‍तव्य म्हणजे एकप्रकारचा विनोदच आहे, अशा शब्दात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवली.

येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी नारायण राणेंच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘नारायण राणेंना आपला स्वाभिमान पक्ष एक वर्ष टिकवता आला नाही. त्याचा वर्धापन दिन साजरा करण्यापूर्वीच विसर्जित केला. त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करणे, म्हणजे विनोद केल्यासारखेच आहे. राणे फक्‍त वल्गनाच करत आले आहेत. त्यांच्या वक्‍तव्यांची आता आम्ही दखलच घेत नाही.’’

हेही वाचा - Success Story : दहा गुंठ्यांत पानमळा पिकवून झाला लखपती -

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाची जागा मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने खरेदी केल्याच्या नीलेश राणेंच्या आरोपावर ते म्हणाले, ‘‘संबंधित नातेवाईकांचा जमीन खरेदीचा पूर्वापार व्यवसाय आहे; परंतु प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे मुख्यमंत्री यांनी तो प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.’’ 

एकही शिवसैनिक भाजपात जाणार नाही

रत्नागिरीतील एकही शिवसैनिक भाजपमध्ये जाणार नाही, अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘राहुल पंडित हे कट्टर शिवसैनिक आहेत. रवींद्र चव्हाण यांनी पंडित यांची भेट घेऊन शिवसेनेत येण्याचा मार्ग विचारला आहे. भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. उदय बने सध्या आजारी असल्यामुळे त्यांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा उपयोग आम्ही योग्य वेळी करून घेत आहोत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षपदाविषयी निर्णय झालेला नाही.’’

हेही वाचा -  कणकवलीत घरातून हातोहात तीन लाखांचे दागिने लंपास -

 

संपादन - स्नेहल कदम