भूगर्भाची अचूक माहिती मिळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (केआरसीएल) राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्थेच्या (एनजीआरआय) सहकार्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मंत्रालयांतर्गत शासकीय व औद्योगिक संशोधन परिषदेशी करार केला आहे.

रत्नागिरी - कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (केआरसीएल) राष्ट्रीय भौगोलिक संशोधन संस्थेच्या (एनजीआरआय) सहकार्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मंत्रालयांतर्गत शासकीय व औद्योगिक संशोधन परिषदेशी करार केला आहे.

केआरसीएलच्या संभाव्य प्रकल्पांमध्ये पृष्ठभागापासून चारशे मीटर खोल भूगर्भीय माहितीचा लवकरात लवकर आणि अचूक अभ्यास करण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.

हैदराबादमधील उप्पल येथील एनजीआरआयच्या मुख्य कार्यालयात सह्या झाल्या. चारशे मीटर खोल भागाचा भौगोलिक अभ्यास करून प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामे संबंधित संस्थेच्या सहयोगाने करण्यात येणार आहेत. केआरसीएलने भारतातील आतापर्यंत उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून डोंगराळ प्रदेशात टनेलिंग केले आहे. अनिश्‍चित अशा भौगोलिक परिस्थितीतील आव्हाने सहजरीत्या पेलून प्रकल्प पूर्ण केले आहेत. काश्‍मीरसारख्या दुर्गम भागात रेल्वे मार्ग उभारण्याचे काम हाती घेतले.

कोकणातील भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या भूभागात रेल्वेने काम केले आहे. पाच वर्षांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी कोकण रेल्वेने भरपूर प्रयत्न केले. त्यात यशही आले. भविष्यात कोकण रेल्वेचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प होऊ घातलेले आहेत. त्यात कराड-चिपळूण आणि कोल्हापूर-वैभववाडी यांचा समावेश आहे. यामध्ये बोगदे, डोंगराळ भागातून रेल्वे मार्ग जाणार आहे. या दोन्ही मार्गांच्या कामांसाठी कोणाचीही नियुक्‍ती करण्यात आलेली नाही. भविष्यात अशा प्रकारच्या प्रकल्पांची कामे कोकण रेल्वेकडे आली तर त्याला सामोरे जाण्यासाठी एनजीआरआय संस्था उपयुक्‍त ठरणार आहे.

हैदराबादला या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कोकण रेल्वेतर्फे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि एनजीआरआयचे संचालक डॉ. व्ही. एम. तिवारी उपस्थित होते.

Web Title: mportant Agreement on Konkan Railway for Government and Industrial Research