मिरकरवाडा बंदरात येणाऱ्या गाळाला पायबंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

संरक्षक भिंतीमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गाळावर काही प्रमाणात पायबंद बसला आहे. त्यामुळे बंदरात नौका सुरक्षित उभ्या राहणार आहेत. 

- पुष्कर भुते, मच्छीमार 

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरातील गाळाचा प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे. जुन्या भिंतीचे रुंदीकरण आणि नव्याने बांधलेली साडेचारशे मीटरची दुसरी भिंत यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे; मात्र शासनाकडून प्राप्त झालेला 57 कोटींचा निधी या कामातच संपुष्टात आला. उर्वरित 37 कोटींची तरतूद केली तरीही मेरीटाईम बोर्डाला तो मिळालेला नाही. 

मिरकरवाडा बंदरासाठी टप्पा 2 मधून 74 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. पहिल्या टप्प्यात गाळावर रोख लावण्यासाठी मशिदीजवळील संरक्षक भिंत वाढविणे आणि पांढरा समुद्र येथे नवीन संरक्षक भिंत बांधली. त्यासाठी 41 कोटी 34 लाखांची तरतूद होती. प्रत्यक्षात दहा कोटी रुपये अधिकचा खर्च झाला. बहुतांश खर्च या दोनच कामांवर झाला. गाळ काढण्यासाठी सहा कोटी खर्च झाले, मात्र अजूनही गाळ शिल्लक आहे.

संरक्षक भिंत आणि काही प्रमाणात काढलेल्या गाळामुळे बंदरात नौकांची ये-जा सहज होत आहे. शेवटच्या दोन जेटी गाळात रुतल्या होत्या. तेथे बऱ्यापैकी पाणी साचले आहे. तिथे पूर्वी फायबर बोटी उभ्या केल्या जात होत्या. यावर्षी तिथे मोठ्या मच्छीमारी नौका उभ्या केल्या आहेत. शिल्लक गाळ काढला, तर संरक्षक भिंतीमुळे तयार झालेल्या मोकळ्या जागेत आणखी नौका उभ्या करणे शक्‍य होईल. 

वाढीव अंदाजपत्रकानुसार निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. 37 कोटी रुपयांची तरतूद झाली तो निधी येण्याची प्रतीक्षा आहे. 

संरक्षक भिंतीमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गाळावर काही प्रमाणात पायबंद बसला आहे. त्यामुळे बंदरात नौका सुरक्षित उभ्या राहणार आहेत. 

- पुष्कर भुते, मच्छीमार 

टप्पा 2 मधील शिल्लक कामे 
मिरकरवाडा बंदरातील शिल्लक कामांमध्ये रिवेंटमेंट तयार करणे, स्लोपिंग हार्ड व स्लोपिंग रॅम्प बांधणे, अंतर्गत रस्ते बांधणे, ऑक्‍शन हॉल, प्रशासकीय इमारत, गिअर शेड, जाळे विणण्यासाठी शेड, विश्रामगृह, उपाहारगृह, फिश मर्चंट डॉर्मिटरी रेडिओ कम्युनिकेशन सेंटर, प्रसाधनगृह, गार्ड हाऊस, कंपांउड वॉल, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, पंप हाऊस, वेस्ट वॉटर ट्रिटमेंट सिस्टीम यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mud sedimentation process in Mirkarwada port stopped