"मल्टिस्पेशालिटी' अडले जागेच्या गोंधळात 

भूषण आरोसकर
Tuesday, 29 September 2020

सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधीचा निधी जिल्हासाठी आणला.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत; मात्र जिल्ह्यासाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 
जागेच्या गोंधळामुळे अडकले आहे. यातून मार्ग काढण्याची मागणी जोर धरत आहे. 

सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाच्या काळात कोट्यवधीचा निधी जिल्हासाठी आणला. त्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी वीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करुन आणले आहेत. हे हॉस्पिटल सावंतवाडीत होण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेत या हॉस्पिटलसाठी भुमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले; मात्र ही जागा न्यायप्रविष्ट असल्याने हॉस्पिटलसाठी एक विटही याठिकाणी रचली गेली नाही. 

अलिकडेच या हॉस्पिटलचा मुद्दा चांगलाच गाजला तो शहरातील मंजुर हॉस्पिटल शहराबाहेर इतरत्र हलविण्यावरुन. खासदार विनायक राऊत यांनी येथील एका कार्यक्रमात यासंदर्भात विधान केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार राऊत यांनी वेत्ये येथे या हॉस्पिटलसाठी पर्यायी जागेची पाहणीही केली. यावरून टीका झाली. या प्रकल्पासाठी विनामोबदला जागा आवश्‍यक असल्याचा मुद्दा पुढे आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडीतील जागेबाबत तोडगा काढायचाही प्रयत्न केला.

खुद्द केसरकर यांनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीतच होणार आहे, उगाच आपापसात वाद नको. जागेचा तिढा सोडविणार, असे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देत भूमीपूजन झालेल्या जागेचा मोबदला देऊन ही जागा भूसंपादन होण्याच्या दृष्टीने रितसर प्रस्ताव शासन दप्तरी पाठवा, अशी मागणी केली होती; मात्र त्यानंतर हा विषयच मागे पडला. 

आज कोरोनाचा जिल्हातील शिरकाव लक्षात घेता आणि जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी शेकडो रुग्ण दाखल होत आहेत; मात्र कोणावरच योग्य व अपेक्षित उपचार होत नाहीत. जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय मंजूर आहे; मात्र इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यातील या महाविद्यालच्या उभारणीसाठी काहीच हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे सक्षम आरोग्य यंत्रणा होण्यासाठी वीस कोटी रुपये मंजूर असलेले व सावंतवाडी शहरात भूमीपुजन झालेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल तरी उभे राहावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे. 

"मल्टिस्पेशालिटी' हे सावंतवाडीतच होणार आहे. कोरोना काळात या विषयाला काहीसा ब्रेक लागला आहे. यासाठी प्राप्त निधी अद्यापही कुठेच वळविलेला नाही. लवकरच आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. 
- संजय पडते, जिल्हाप्रमुख, शिवसेना 

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नियोजित जागेतच होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्‍न सुटल्यानंतर हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी येत्या काही दिवसांत जिल्ह्यात येऊन या विषयावर चर्चा करणार आहे. 
- उदय सामंत, पालकमंत्री 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: multispeciality hospital issue sawantwadi konkan sindhudurg