खारेपाटणमध्ये अखेर बॉक्‍सवेलला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

खारेपाटण - येथील महामार्गावरील बाजारपेठ हायस्कूल मार्गावर अखेर बॉक्‍सवेलला मंजुरी मिळाली आहे. बॉक्‍सवेल होण्यासाठी खारेपाटणवासीयांनी पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन छेडून काम बंद केले होते. अखेर बॉक्‍सवेलला मंजुरी मिळाल्यानंतर चौपदरीकरण कामाला पुन्हा प्रारंभ झाला आहे.

खारेपाटण - येथील महामार्गावरील बाजारपेठ हायस्कूल मार्गावर अखेर बॉक्‍सवेलला मंजुरी मिळाली आहे. बॉक्‍सवेल होण्यासाठी खारेपाटणवासीयांनी पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन छेडून काम बंद केले होते. अखेर बॉक्‍सवेलला मंजुरी मिळाल्यानंतर चौपदरीकरण कामाला पुन्हा प्रारंभ झाला आहे.

खारेपाटण सुखनदीवरील पुलाचे काम अजूनही ठप्पच राहिले आहे. अर्धवट असलेल्या पुलांचे अद्यापही स्ट्रक्‍चरल ऑडिट न झाल्याने ठेकेदार कंपनीने या पुलाचे काम सुरू केलेले नाही. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात खारेपाटण येथे सर्कल प्रस्तावित होते. मेजर सर्कल असल्याने येथील नागरिकांनीही त्याला मंजुरी दिली होती; मात्र प्रत्यक्ष काम करताना मायनर सर्कल असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. 

खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर कुबल, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे यांच्यासह मंगेश गुरव, दिलीप तळेकर, नंदू कोरगावकर, प्रमोद निग्रे, शंकर राऊत, रमेश जामसंडेकर, राजू वरूणकर आदींनी आज महामार्ग प्राधिकरणचे उपकार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांची भेट घेतली. यावेळी ओटवणेकर यांनी खारेपाटण येथे बॉक्‍सवेलला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. सध्या बॉक्‍सवेलचा आराखडा तयार केला जात असून, दहा दिवसांत बॉक्‍सवेलची भिंत उभारण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती दिली.

अंडरपास नसल्याने नाराजी
महामार्गावर साळीस्ते, वारगाव, नडगिवे ही मोठी लोकवस्तीची गावे आहेत. या गावांच्या ठिकाणी अंडरपासची मागणी होती. जेणे करून प्रवाशांना महामार्गाखालून जा-ये करणे सुलभ झाले असते; मात्र कुठेच अंडरपास नसल्याने नागरिकांना जीव धोक्‍यात घालूनच महामार्गावरून जा-ये करावी लागणार आहे.

खारेपाटण शहरात लगतच्या पंचक्रोशीतील दीड हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मायनर सर्कलमुळे या विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आली असती. त्यामुळे बॉक्‍सवेल अत्यावश्‍यकच होता.
- प्रवीण लोकरे
, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Goa Four track highway boxwell in Kharapatan