मुंबई-गोवा महामार्ग एजन्सीच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

कणकवली - मुंबई-गोवा महामार्गातील सिंधुदुर्ग हद्दीतील ८३ किलोमीटरचा टप्पा दोन कंपन्यांकडे वर्ग केला आहे. यातील कलमठ ते झाराप टप्प्याच्या सर्वेक्षणाचे काम भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉम कंपनीने सुरू केले आहे.

कणकवली - मुंबई-गोवा महामार्गातील सिंधुदुर्ग हद्दीतील ८३ किलोमीटरचा टप्पा दोन कंपन्यांकडे वर्ग केला आहे. यातील कलमठ ते झाराप टप्प्याच्या सर्वेक्षणाचे काम भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉम कंपनीने सुरू केले आहे.

येत्या पावसाळ्यानंतर चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ गावांतील बाधितांना ७३४ कोटी ८२ लाख रुपयांचा निवाडा जाहीर झाला होता. यात पहिल्या टप्प्यात कणकवली तालुक्‍यासाठी २५६ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तालुक्‍याचा उर्वरित निवाडा तसेच कुडाळ तालुक्‍यातील गावांची मोबदला रक्‍कम अद्याप प्राप्त झालेली नाही. एप्रिल अखेरपर्यंत सिंधुदुर्ग हद्दीतील सर्व गावांची निवाडा रक्‍कम भूसंपादन विभागाकडे प्राप्त होईल. तर ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत सर्व नुकसानग्रस्तांच्या खात्यात मोबदला वर्ग होईल आणि ऑक्‍टोबर पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, अशी शक्‍यता महामार्ग अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.

महामार्ग चौपदरीकरणातील सिंधुदुर्ग विभागाचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यातील खारेपाटण ते कलमठ या टप्प्याचे काम के. सी. सी. बिल्डकॉन (हरियाना) या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. तर कलमठ ते झाराप या टप्प्याचे काम दिलीप बिल्डकॉन (भोपाळ) या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. ठेका निश्‍चित झाल्यानंतर दिलीप बिल्डकॉम कंपनीचे चौपदरीकरणासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. यात गेल्या आठ दिवसांपासून या कंपनीकडून कलमठ ते झाराप या टप्प्याचे महामार्ग दुतर्फा सर्वेक्षण केले जात आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, जाहीर झालेल्या निवाड्याची सर्व रक्‍कम केंद्र शासनाकडून अद्याप भू-संपादन विभागाकडे वर्ग झालेली नाही. सिंधुदुर्गात सध्या फक्त कणकवली तालुक्‍यासाठी २५६ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. 

कणकवलीसह जिल्ह्यातील उर्वरित गावांसाठी अजूनही ४७८ कोटी मोबदला रक्‍कम येणे बाकी आहे. ही रक्‍कम प्राप्त होताच, प्रत्येक खातेदारांना त्यांच्या हिश्‍श्‍याची रक्‍कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानंतर चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

महामार्ग चौपदरीकरणातील खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप या दोन्ही टप्प्यांसाठीचे खासगी कंपन्यांसोबतचे करार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग या कंपन्यांकडे वर्ग झाला आहे. यापुढे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत महामार्गाची देखभाल, दुरुस्ती व त्या अनुषंगाने इतर कामे ही त्या त्या एजन्सीच्या अखत्यारित येणार आहेत. 

मात्र, महामार्ग प्राधिकरणाकडे केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या निधीतील हायवेची प्रस्तावित कामे सध्या सुरू आहेत. खड्डे भरणे, पॅच करणे ही कामे मार्च २०१७ अखेरपर्यंत महामार्ग प्राधिकरणमार्फत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या असलेला महामार्ग सुस्थितीत करूनच संबंधित एजन्सीच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

जमिनीचा ताबा मिळाल्यानंतरच चौपदरीकरण
चौपदरीकरणाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीकडून सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू असले तरी या कंपन्यांना अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. मोबदला रक्‍कम वितरण झाल्यानंतर तसेच ८० टक्के जमीन ताब्यात येताच चौपदरीकरण कामाच्या कार्यारंभाचे आदेश या दोन्ही कंपन्यांना दिले जाणार आहेत. या दरम्यान या दोन्ही कंपन्यांची आर्थिक सक्षमता देखील तपासली जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे काम तेथील कंपन्यांच्या आर्थिक सक्षमतेअभावी गेले सहा वर्षे रेंगाळले आहे. तशी स्थिती उर्वरित टप्प्यासाठी होऊ नये, यासाठीही दक्षता घेतली जात असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली.

Web Title: mumbai-goa highway acquire by agency