मुंबई-गोवा महामार्ग बनला तळीरामांचा अड्डा

अमित गवळे
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई-गोवा महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले व अपूर्ण काम, खड्डे अाणि धूळ यामुळे प्रवाशी पुरते हैराण झाले आहेतच. मात्र अाता हा महामार्ग तळीरामांचा अड्डा बनला आहे. रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी बिअर व दारुच्या बाटल्या सर्रास पडलेल्या पहायला मिळतात.

पाली : मुंबई-गोवा महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले व अपूर्ण काम, खड्डे अाणि धूळ यामुळे प्रवाशी पुरते हैराण झाले आहेतच. मात्र अाता हा महामार्ग तळीरामांचा अड्डा बनला आहे. रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी बिअर व दारुच्या बाटल्या सर्रास पडलेल्या पहायला मिळतात.

उन्हाळी सुट्यांमुळे सध्या महामार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यात महामार्गाचे काम चालू असल्याने काही ठिकाणचा एका बाजूचा रस्ता अर्धवट काम करुन सोडण्यात अाला आहे. जाणारे-येणारे अनेक जण रस्त्याच्या बाजूला संध्याकाळी व रात्री गाडी थांबवून दारु पार्टी करतात. तर काही ठिकाणी छोटे पूल व मोर्यांच्या स्लॅपवर बसून दारुचे पॅक रिचवितात. काही दारुडे तर रस्त्यावरुन हालत डुलत चालत जातात. यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो. 

काही वेळा या दारुच्या व बिअरच्या बाटल्या रस्त्यावर टाकल्या जातात. त्यामुळे बाटल्या फुटून काचा रस्त्यावर पसरतात. परिणामी वाहनांच्या टायरमध्ये किंवा पादचाऱ्यांच्या पायात जाण्याचा धोका निर्माण होतो. काचांवरुन जाणे टाळण्यासाठी अनेकजण या काचांच्या बाजूने वाहन वळवितात. त्यामुळे समोरुन येणाऱ्या वाहनांना धडकण्याचा भीती अाहे. महामार्गावरील वाहतूक पोलिसांची मात्र याकडे नजर नसते. अनेक जण पाण्याच्या व कोल्ड्रिंकच्या बाटल्याही महामार्गावर टाकता. त्यामुळे महामार्गावर प्रदूषणही होत आहे.

प्रवासी व वाहनचालक पुरते हैराण

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सहा वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. या दुरवस्थेमुळे रोज होणार्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण या महामार्गावर जात आहेत. त्यामुळे प्रवासी व वाहनचालक पुरते हैराण झाले अाहेत. अाता दारुड्यांमुळे हा मार्ग चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Mumbai Goa Highway become a spot of Become