कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांना अटक होण्याची शक्यता....

भुषण आरोसकर | Thursday, 30 July 2020

कारागृह अधीक्षक पाटील यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : येथील कारागृहातील कैदी राजेश गावकर मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने काल बुधवारी फेटाळून लावला आहे. यामुळे कारागृह अधीक्षक पाटील यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. 

येथील कारागृहातील कैदी राजेश गावकर यांचा 19 डिसेंबर 2019 ला कारागृहात मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचा मृत्यू हा मारहाणीत झाल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले होते. याप्रकरणी कारागृह अधीक्षक योगेश पाटील आणि सुभेदार झिलबा पांढरमिसे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- रत्नागिरीमध्ये  2 पोलिस, एका नर्ससह 21 जण  कोरोना बाधित.... -

मात्र या प्रकरणात हे दोघेही फरार होते. दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी दोघांनीही जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता, मात्र त्यांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर अटक पूर्व जामिनासाठी दोघेही उच्च न्यायालयात गेले. याप्रकरणी न्यायालयाने येथील उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारी वकील एस व्ही गावंड यांच्या माध्यमातून न्यायालयाकडे आपले म्हणणे मांडले. यात 19 डिसेंबर 2019 पूर्वी घडलेली सर्व हकीकत न्यायालयाला पटवून दिली.

हेही वाचा-गुहागर, मंडणगड व दापोलीतील ५० दिवसांत ६२८ गावे झाली प्रकाशमय... -

न्यायालयाने शवविच्छेदन अहवाल तसेच सहका-यांचे जबाब लक्षात घेता संशयित विरोधात गंभीर आरोप आहेत आणि त्याची चौकशी केल्याविना सत्य बाहेर येणार नाही, त्यामुळे अटकेपासून संरक्षण यासाठी पात्र ठरत नाहीत असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. तसेच सर्व मुद्द्यांचा विचार करता कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे योगेश पाटील आणि  दीलबा झिलबा पांढरमिसे त्यांचा उच्च न्यायालयातही अटकपूर्व जामिनाचा मार्ग जवळपास बंद झाल्याने आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे 

संपादन - अर्चना बनगे