चिपीतून मुंबई, पुणे, नाशिक विमानफेऱ्या प्रस्तावित

चिपीतून  मुंबई, पुणे, नाशिक विमानफेऱ्या प्रस्तावित

सावंतवाडी - बहुचर्चित चिपी (ता. वेंगुर्ले) विमानतळावरून रोज तीन विमानफेऱ्यांसाठी नागरी हवाई उड्‌डाण मंत्रालयात बोली मागविली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक अशा तीन शहरांशी यामुळे सिंधुदुर्ग हवाई मार्गाने जोडला जाणार आहे. ही निवड प्रक्रिया २७ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. उडान योजनेतून या फेऱ्या निश्‍चित केल्या जाणार असल्याने याचा तिकीट दरही कमी असणार आहे. 

नागरी हवाई उड्‌डाण मंत्रालयाने उडान योजनेअंतर्गत घेतलेल्या विमानफेऱ्यांसाठी विमान कंपन्यांकडून बोली (ई-बिडिंग) मागवली आहे. यात सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचा समावेश केला आहे. नागरी हवाई उड्‌डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी चिपीला झुकते माप देत, रोज तीन शहरांना जोडणाऱ्या विमानफेऱ्या प्रस्तावित केल्या आहेत. यात सिंधुदुर्ग ते मुंबई (मार्गाची लांबी ३६३ कि.मी), मुंबई ते सिंधुदुर्ग (३५० कि.मी.), सिंधुदुर्ग ते पुणे (३२२ कि.मी.), पुणे ते सिंधुदुर्ग (३२२ कि.मी), सिंधुदुर्ग ते नाशिक (५२२ कि.मी), नाशिक ते सिंधुदुर्ग (५०९ कि.मी.) या फेऱ्यांचा समावेश आहे. यासाठी विमान कंपन्यांनी १३ तारखेपासून बोलीसाठीची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे.

या सर्वांची प्रक्रिया होऊन निवड प्रक्रिया २७ फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार पर्यटन जिल्हा असल्याने सिंधुदुर्गहून राज्यातील तीन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या फेऱ्या रोज असतील असे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यात सध्या सुरू असलेल्या विमानफेऱ्याही सिंधुदुर्गशी जोडल्या जाऊ शकतात. येथे विमानसेवा कायम सुरू राहील अशा पद्धतीने नियोजनाचा प्रयत्न सुरू असल्याचे नागरी हवाई उड्‌डाण मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

परवडणारा तिकीट दर असणार
या फेऱ्या केंद्राच्या उडान योजनेअंतर्गत आहेत. यामुळे यासाठी विमान कंपन्यांना किमान पाठबळ दिले जाणार आहे. यात विविध सवलती, अनुदान यांचा समावेश असणार आहे. यामुळे तिकिटाचा दर सर्वसामान्यांना परवडेल असा ठेवावा लागणार आहे. 

रत्नागिरी-मुंबईसाठीही बोली मागविली
लगतच्या रत्नागिरी विमानतळावरूनही नियमित फेरीसाठी बोली मागविली आहे. यात रत्नागिरी ते मुंबई (२७५ कि.मी.) आणि मुंबई ते रत्नागिरी (२३६ कि.मी.) या फेऱ्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com