मुंबई विद्यापीठ दर्जात नापास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

रत्नागिरी - देशातील पहिल्या १५० विद्यापीठांमध्ये सर्वांत जुन्या, नामांकित अशा मुंबई विद्यापीठाला स्थान मिळाले नाही. सलग तिसऱ्या वर्षी मुंबई विद्यापीठाला अपयश आले. हे विद्यापीठ सपशेल नापास झाल्याने कोकणवासीयांनी पुन्हा एकदा स्वतंत्र कोकण विद्यापीठाची जोरदार मागणी केली आहे. प्रशासन व्यवस्था व विद्यार्थ्यांना सोयीचे आणि कोकणच्या गरजेचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कोकण विद्यापीठच हवे, अशी मागणी होत आहे.

एनआयआरएफने जाहीर केलेल्या यादीमध्ये बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम, आयआयटी-मद्रास दुसऱ्या व आयआयटी-मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा नववा क्रमांक या यादीत आहे. देशभरात उच्च शिक्षणाचे धडे देणाऱ्या संस्थांचा दर्जा सुधारावा म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देशपातळीवरील क्रमवारी जाहीर केली.

देशाच्या पहिल्या १५० संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश नाही, हे दुर्दैवी आहे. गतवर्षी ऑनलाईन असेसमेंटचा उडालेला बोजवारा व त्यातून निकालांना झालेला प्रचंड विलंब, प्रशासनामधील अकार्यक्षमता तसेच उशिरा निकालामुळे विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान झाले. विद्यापीठात गेले दोन वर्षं गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ऑनलाईन पेपर तपासणीत झालेल्या विलंबामुळे कुलगुरूंना राजीनामा द्यावा लागला, हे विद्यापीठाच्या दृष्टीने मानहानीकारक ठरले.

या सर्व पार्श्‍वभूमीवर कोकण विद्यापीठाची मागणी जोर धरत आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही याप्रश्‍नी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिल्याने विद्यापीठाचा विषय मार्गी लागेल, अशी कोकणवासीयांना आशा आहे. मुंबई विद्यापीठाची वैभवशाली परंपरा आपल्याला लाभणार नाही, असे विरोधी मतही काही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र दहावी-बारावीसाठी स्वतंत्र कोकण मंडळाने जशी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, त्या प्रकारे विद्यापीठही गुणवत्ता दाखवेल, असे मतही विद्यापीठ मागणी समितीने व्यक्त केले आहे.

कोकणातील विद्यार्थी हुशार, प्रामाणिक, कष्टाळू असल्याने कोकण विद्यापीठ स्वतःचे स्थान देशाच्या शैक्षणिक नकाशावर अधोरेखित करेल. स्वतःच्या पायावर सक्षमपणे दमदार वाटचाल करेल. यातूनच कोकण विद्यापीठाची एक नवी संस्कृती तयार होईल. लोणेरे येथे तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कोकण कृषी विद्यापीठ ज्याप्रमाणे स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे आहे. त्याप्रकारे कोकण विद्यापीठही उभे राहील.
- ॲड. विलास पाटणे, कोकण विद्यापीठ निमंत्रक

Web Title: mumbai university quality