जमीन वादातून दाभोलीत खून

जमीन वादातून दाभोलीत खून

वेंगुर्ले - दाभोली- मोबारकरवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत दगडावर डोके आदळून एकाचा मृत्यू झाला. भानुदास सुदाम मोर्जे (वय ५२) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात उपसरपंच संदीप पाटीलसह चौघांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चारही संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ पोलिसांना घेरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
वेंगुर्ले पोलिसांनी सांगितले, की भानुदास मोर्जे व पाटील कुटुंबीय यांच्यात जमिनीचा वाद आहे. यातून हा प्रकार घडला. या प्रकरणी उपसरपंच संदीप पाटील व त्याचे भाऊ शैलेश पाटील, तर दाभोली येथील राजाराम ऊर्फ बंड्या कांबळी व भाई दाभोलकरवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयित पसार असून, येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत तपास करत आहेत. उपसरपंच संदीप पाटील याचा दाभोली ग्रामपंचायत येथे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी दाभोलीत बंद पाळण्यात आला.

वेंगुर्ले पोलिस ठाण्यात भानुदास यांचा मुलगा सुदाम याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शैलेश पाटील, राजाराम कांबळी, भाई दाभोलकर यांनी सकाळी आमच्या जमिनीशेजारी येऊन आमच्या कुंपणाच्या लगत सिमेंटचे पोल पुरून कुंपण घालण्यास सुरवात केली. त्यावेळी आम्ही विचारणा केली असता, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने उपसरपंच संदीप पाटील याने तेथे येऊन आम्हाला शिवीगाळ केली व ‘कुंपण घालणारच,’ असे सांगितले.

यावेळी आपण, वडील, आई लक्ष्मी, भाऊ गौरव, माझी पत्नी अर्पिता असे आम्ही सर्वानी हा विषय उद्या सरपंचांसंमवेत बसून मिटवूया असे सांगितले. याचा राग आल्याने संदीप याने वडिलांना मारण्यास सुरवात केली. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही गेलो असता त्या तिन्ही जणांनी आम्हा सर्वांना मारण्यास सुरवात केली. तेवढ्यात संदीप याने वडिलांना जोरात मारून सिमेंटच्या पोलावर आपटले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून त्या चारही जणांनी तेथून धूम ठोकली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. येथील रुग्णालयात शवविच्छेदन केले आहे; मात्र जोपर्यंत त्या संशयितांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांचे कुटुंबीय, ग्रामस्थ, मच्छीमार समाज यांनी सायंकाळी उशिरापर्यंत घेतला होता. यावेळी सुमारे १५० ते २०० नागरिक उपस्थित होते. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान येथील ग्रामीण रुग्णालय येथे जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना झाले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच दाभोलीचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, स्वाभिमान पक्ष, शिवसेना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी याप्रकरणी कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला. उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com