शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - तालुक्‍यातील खेडशी येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला. काल (ता. नऊ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार झाल्याची चर्चा होती; मात्र पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास चक्रे फिरवून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

मैथिली प्रवीण गवाणकर (वय 17, रा. खेडशी-चिंचवाडी) असे खून झालेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. मैथिली शेळ्या चारण्यासाठी घरा शेजारच्या जंगलात गेली होती. सायंकाळी शेळ्या घरी आल्या; परंतु मैथिली आली नाही. म्हणून वडील प्रवीण गवाणकर यांनी ग्रामीण पोलिसात बेपत्ता  झाल्याची तक्रार दिली. स्थानिकांच्या मदतीने रात्री शोधाशोध सुरू असताना 10 वाजता जंगलात एका दगडी गडग्याच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापती होत्या.

बिबट्याच्या हल्ल्यात ती ठार झाली असा स्थानिकांचा संशय होता. याची खबर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह कर्मचारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. तिच्या डोक्‍यात अवजड वस्तू घातल्याचे निदर्शनास आले. प्रचंड रक्तस्राव होऊन मेंदू बाहेर आल्याचे दिसून आले. यावरून हा खून असल्याचे पोलिसांनी निश्‍चित केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिरीष सासने, शहर पोलिस निरीक्षक लाड आदींनी घटनास्थळाला भेट दिली. मैथिली महालक्ष्मी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीला शिकत होती. वेळ मिळाली, की संध्याकाळी ती शेळ्या चारण्यासाठी जात असे. खून झाला त्या ठिकाणाच्या बाजूला काही अंतरावर रो-हाऊसचे काम सुरू आहे. खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही, 

दगडाने किंवा अन्य अवजड वस्तू डोक्‍यात घालून खून झाला आहे, हे निश्‍चित; मात्र आम्ही त्याचे कारण आणि आरोपीच्या मागावर आहोत. लवकरच आपल्यासमोर संशयित आरोपी असतील. 
-डॉ. प्रवीण मुंढे, 

जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a minor girl who goes to feed a goat