सिंधुदुर्ग : भालावलमध्ये तरूणाचा घातपात की आत्महत्या ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

समीरच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी समीरचे नातलग बकऱ्यांना रानातून घरी आणत असताना त्याचा मोबाईल वाटेत मिळाला होता. समीर आंघोळीहून घरी आला नसल्याने सायंकाळी मोबाईल मिळालेल्या दिशेने उशिरा कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

ओटवणे ( सिंधुदुर्ग ) - भालावल धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे (वय 21) या युवकाचा मृतदेह आज सकाळी विलवडे भालावल या दोन गावांच्या सिमेलगत असलेल्या मातीनाला बंधाऱ्यात आढळून आला. कुटुंब व स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार समीर हा बंधाऱ्यात आंघोळीसाठी कधीच जात नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे समीरने आत्महत्या केली की कुणी त्याचा घातपात केला याबाबत संशय आहे. 

पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार समीर काल (ता.6) दुपारी अन्य तीन मित्रांसमवेत मातीनाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेला होता. आपण मागाहून येतो, असे मित्रांना सांगून तो तेथेच राहिला. 

समीरच्या काकांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी समीरचे नातलग बकऱ्यांना रानातून घरी आणत असताना त्याचा मोबाईल वाटेत मिळाला होता. समीर आंघोळीहून घरी आला नसल्याने सायंकाळी मोबाईल मिळालेल्या दिशेने उशिरा कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा बंधाऱ्यानजीक समीरचे कपडे व चप्पल आढळून आले. त्यामुळे त्यांचा संशय अधिकच बळावला; पण रात्री काळोख झाल्याने त्याच्या विषयी काही समजले नाही. 

आज सकाळी वाडीतील ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबविली. त्यावेळी बंधाऱ्यात समीरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. 
मातीनाला बंधाऱ्याची उंची बघता सुमारे 10 फूट खोल पाणीसाठा आहे. समीर पोहण्यात सुद्धा तेवढा पटाईत नव्हता. असे असून देखील तो मागाहून पाण्यात एकटाच आंघोळीसाठी का बरा उतरला असेल असा प्रश्‍न नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे.

बांदा पोलीस निरीक्षक ए. डी. जाधव आणि पोलीस हवालदार तातू कोळेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. समीरच्या पश्‍चात आई, वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Or Suicide Of Youth in Bhalaval Sindhudurg