पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्याला ग्रामस्थांनी बांधले झाडाला 

पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्याला ग्रामस्थांनी बांधले झाडाला 

दोडामार्ग - तालुक्‍यातील झरेबांबर काजूळवाडी येथे एकाने आज पत्नीचा खून केला. ग्रामस्थांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती ज्ञानेश्वर पेडणेकरला पकडून झाडाला बांधले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पत्नी नम्रता (वय 53) हिच्या खुनासाठी वापरलेला सुरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - नम्रता पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी खरापाल, गोवा येथे गेल्या चार महिन्यांपासून राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा समीर गोव्यात; तर लहान मुलगा किरण साटेली भेडशी येथे एका हॉटेलमध्ये कामाला आहे. पेडणेकरला दारूचे व जुगाराचे व्यसन आहे. तो दिवसभर नशेतच असायचा. घरच्यांना व आजूबाजूच्या लोकांना तो विनाकारण शिव्या देऊन भांडण करायचा. माहेरी गेलेल्या नम्रता सोमवारी नागपंचमी असल्याने रविवारी घरी आल्या होत्या. आल्यावर त्यांनी साटेलीत राहणाऱ्या किरणला घरी बोलावले. त्यामुळे किरण रविवारी घरी आला होता. बऱ्याच दिवसांनी पत्नी घरी आल्याने ज्ञानेश्वर याने नम्रताबरोबर भांडण सुरू केले आणि घरातून हाकलून दिले. त्यामुळे त्या शेजाऱ्यांकडे जेवल्या आणि उशिरा आपल्या घरी येऊन बाहेर ओट्यावर मुलगा आणि त्या झोपल्या. 

नागपंचमी असल्याने त्यांनी किरणला आज सकाळीच साटेली भेडशी येथे नागोबा आणायला पाठविले व घरातील आवरून त्या घराजवळच्या बोअरवेलवर पाणी आणण्यासाठी गेल्या. त्या एकट्याच असल्याचे पाहून ज्ञानेश्वरने तेथे जाऊन त्यांच्यावर सुऱ्याने वार करत जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत त्या आरडाओरडा करत धावत आपल्या घरी येऊन दरवाज्यावर पडल्या. तिथेच त्या गतप्राण झाल्या. 

दरम्यान, आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी जमा झाले. पत्नीचा खून करून ज्ञानेश्‍वर पळून जात होता. घरापासून काही अंतरावर गेला असता ग्रामस्थांनी त्याला पकडून घरासमोरील झाडाला बांधून ठेवले आणि येथील पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निरीक्षक सुनील थोपटे पोलिसांसमावेत घटनास्थळी आले. घटनेचा पंचनामा करून पेडणेकरला ताब्यात घेतले. नम्रता पेडणेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेला. 

झरेबांबरमधील तिसरा प्रकार 
गेल्या सोळा वर्षांत झरेबांबरमध्ये खुनाचे तीन प्रकार घडले आहेत. झरेबांबर काजूळवाडी येथे 2002 मध्ये तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपी अद्याप सापडायचे आहेत. त्यानंतर झरेबांबर येथे एकाने पत्नीचा खून केला होता. त्यातील पती जन्मठेप भोगत आहे. त्याच वाडीवर आज पुन्हा एक खून झाला आहे. 

चार वार 
रागाच्या भरात ज्ञानेश्वरने पत्नीवर चार वार केले. दोन वार कुशीत तर दोन वार डोक्‍यात केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली. 

धडपड निष्फळ 
नम्रता यांच्यावर चार वार झाले होते. त्यांतील काही वर्मी लागले होते. त्याही स्थितीत पतीच्या तावडीतून सुटून त्या जगण्याच्या इच्छेने पळत घरापर्यंत आल्या; पण दरवाज्यात त्या कोसळल्या आणि गतप्राण झाल्या. त्यांची जगण्यासाठीची धडपड व्यर्थ ठरली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com