साटेली तर्फ सातार्ड्यात साकारले संगीत नाटक

साटेली तर्फ सातार्ड्यात साकारले संगीत नाटक

सावंतवाडी - सोशल मीडिया आणि सिनेमाच्या जमान्यात व्यावसायिक रंगभूमीवरची नाटके सहजासहजी कोणाला रुचत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस नाटकाचा प्रेक्षकवर्गही कमी झाला आहे; मात्र वेगळे काही तरी करून दाखविण्याच्या उद्देशाने साटेली तर्फ सातार्डा येथील हौशी कलाकारांनी ‘गीता गाती ज्ञानेश्‍वर’ हे संगीत नाट्य सादर करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग नुकताच गावात घेण्यात आला. 

अवघ्या बारा वर्षांच्या मुलीने या नाटकात केलेली मुक्ताईची भूमिका उपस्थित अनेक प्रेक्षकांनी उचलून धरली. यामुळे आता कलकारांत वाघाचे बळ आले आहे. येणाऱ्या काळात आपण या नाटकाला केवळ हौस म्हणून लोकापर्यंत नेऊ, असा विश्‍वास कलाकारांनी व्यक्त केला आहे.तालुक्‍यातील साटेली तर्फ सातार्डा हे गाव तसे डोंगराळ आणि मायनिंग खाणीच्या कुशीत वसलेले. त्या ठिकाणी अनेक हौशी कलाकार आहेत. गावात काही वर्षांपूर्वी नाटके केली जात असत; परंतु त्याला काही तरी वेगळेपण देण्यासाठी प्रथमच संगीत नाटक बसविण्याचा प्रयत्न केला. या वेळी व्यावसायाने वेल्डर असलेल्या संतोष कांबळी आणि त्यांचा सहकारी नारायण कळंगुटकर यांनी ही जबाबदारी पेलली आणि म्हणता म्हणता हे संगीत नाटक प्रत्यक्षात आले आहे. 

त्या नाटकात अवघ्या बारा ते तेरा पात्रांनी धमाल उडवून दिली. विशेष म्हणजे ज्ञानेश्‍वराच्या भूमिकेसोबत अवघ्या बारा वर्षांची असलेल्या आकांक्षा कांबळी हिने मुक्ताईची भूमिका योग्य पद्धतीने वठविली. त्याचबरोबर अन्य कलाकारांनी आपापल्या भूमिका योग्य पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सर्व कलाकार नवखे असताना सुद्धा नाटकात जाणवणारे प्राउंटिंग कोठेही दिसले नाही. 

या सर्व नाटकाच्या प्रवासात ज्ञानेश्‍वर मोगऱ्याचे छोटे असलेले झाड फुलवताना, भिंत चालविताना तसेच समाधी घेतल्यानंतर समाधीवर घातलेला हार थेट त्यांच्या गळ्यात पडतानाचे ट्रिक सीन दाखविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्‍वरांच्या जीवनातील अन्य काही चमत्कार भविष्यात त्या नाटकात घेण्यात येणार आहेत, असे कांबळी यांनी सांगितले. 

दरम्यान, या नाटकात निवृत्ती- सुंदर झोरे, ज्ञानेश्‍वर- नारायण कळंगुटकर, सोपान- परशुराम मांजरेकर, विठू- अक्षय वराडकर, स्मृती भटजी- सिद्धेश पांढरे, साखरेशास्त्री- लक्ष्मण कांबळी, वासुदेव- गौरेश कोरगावकर, विसोबा- संतोष कांबळी अशा स्थानिकांनीच भूमिका वठविल्या आहेत.

स्थानिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे संगीत नाटक उभे करण्यात आले आहे. त्यात पंधराहुन अधिक गाणी आहेत. भविष्यात या नाटकाला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पैसे कमविणे हा उद्देश नाही. ज्ञानेश्‍वरांचे जीवन आणि त्यातून मिळालेला बोध आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचावा हा उद्देश आहे.

- संतोष कांबळी, निर्माता 

हे नाट्य सादर करताना संगीत नाट्य असल्यामुळे मोठी भीती होती; मात्र सर्व कलाकारांनी एकत्र येऊन परिश्रम घेतल्याने हा प्रयोग यशस्वी झाला. भविष्यात संधी मिळाल्यास आम्ही नक्कीच लोकांना वेगळे देण्याचा प्रयत्न करू.
- नारायण कळंगुटकर, कलाकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com