संगीत नाटक जपणारी घोटगेवाडी

संगीत नाटक जपणारी घोटगेवाडी

दोडामार्ग - कोकणातील अनेक गावे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी भरलेली आहेत; पण काही गावे अशी आहेत की एकाच गावाची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. ती त्या गावांची बलस्थाने तर आहेत, तशीच गावाचे वेगळेपण चारचौघात ठळक करणारीही आहेत. घोटगेवाडी हे असेच, अनेक वैशिष्ट्ये अभिमानाने मिरवत असले तरी या गावची खरी ओळख आहे ती संगीत नाटकांची अनेक वर्षांची परंपरा जपणारे म्हणून.

पारगड किल्ल्यावरच्या सरदारांनी घोटगेवाडी गाव वसवले असे सांगण्यात येते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी घोटगेवाडी, बेळगाव म्हणजे कर्नाटकमध्ये होते असे सांगितले तर कुणाचा विश्‍वास बसणार नाही; पण ते सुरवातीला बेळगावमधील खानापूर तालुक्‍यात आणि नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यात होते. ते कर्नाटकमध्ये असल्याचे पुरावे १३५ वर्षे वयाच्या प्राथमिक शाळेत नक्की पाहायला मिळतील.

ऐतिहासिक बाजारपेठ 
पारगड किल्ल्यावरील किल्लेदारांनी घोटगेवाडीला बाजारपेठेचा दर्जा दिला. तेथील सरदारांनीच गाव वसवल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गावात मोठी बाजारपेठ उभी राहिली होती. आजही त्या वैभवशाली बाजारपेठेच्या खुणा ठळकपणे दिसतात. 

घोटगेवाडीचा समावेश सिंधुदुर्गमध्ये झाला तो १९८३ मध्ये.
घोटगेवाडी बारा बलुतेदारांचा संपन्न गाव. सर्व जाती धर्माचे लोक गावात मिळून मिसळून राहतात. गावाला गद्य आणि पद्य नाटकांची परंपरा आहे. गावात गुढी पाडवा, शिमगोत्सव आणि हनुमान जयंतीला नाटके होतात. वैश्‍य समाज नाट्यमंडळ, पुरमार नाट्यमंडळ आणि दत्त प्रासादिक नाट्यमंडळ अशी तीन नाट्यमंडळे आहेत. त्यातील दत्त प्रासादिक नाट्यमंडळ संगीत नाटकांची परंपरा जोपासते आहे.

अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून  गावात संगीत नाटके होताहेत. गावात १९७८ मध्ये वीज आली. तत्पूर्वी नाटके दिवा आणि गॅसबत्तीच्या उजेडात व्हायची. जवळपास तीन पिढ्या संगीत नाटकात आहेत. ज्येष्ठ रंगभूषाकार तात्या पेडणेकर यांचे वडील गोविंद पेडणेकर, रघुनाथ पनवेलकर, रामचंद्र देसाई, रामचंद्र वाडकर, दत्ताराम शेटकर, रामचंद्र पाटगांवकर, व्यंकटेश पाटगांवकर, बाप्पा सांगुर्डेकर, सदाशिव  पाटगांवकर, दत्ताराम गडकरी आदी दिग्गज कलाकारांनी रंगभूमी गाजवली.

त्यावेळी पुरुष कलाकार स्त्री भूमिका करायचे. नंतर स्त्री कलाकार रंगभूमीवर आले तेव्हा बाबुली मणेरीकर, काशिनाथ मणेरीकर, गणपत राऊळ, प्रकाश पांगम, वामन पनवेलकर, नाना पेडणेकर, पद्माकर जुवेकर,अनिल मणेरीकर, धुंडिराज दळवी, शांताराम दळवी, नानासाहेब दांडेकर, मेघश्‍याम मणेरीकर, रघुनाथ मणेरीकर, गंगाराम देसाई, पुंडलिक शेटकर, मधू मणेरीकर यांची पिढी रंगभूमीवर अधिराज्य गाजवत होती. त्यानंतर सलग वीस वर्षे नव्या पिढीने संगीत नाटकाचा वारसा जतन केला. त्यात सदाशिव पाटगांवकर, सगुण कवठणकर, नितीन मणेरीकर, मिलिंद मणेरीकर, हरिश्‍चंद्र शेटकर, गोविंद मराठे, दीपक दळवी, जयसिंग खानोलकर, उदय गवस, राजू देसाई, संतोष तुळसकर आदी कलाकारांची नावे घ्यावी लागतील. हनुमान जयंतीला होणाऱ्या संगीत नाटकाची वाट वर्षभर पाहत असतात ही त्यांच्या कलेला दिलेली दादच म्हणावी लागेल. 

संगीत शारदा, मृच्छकटीक, संशयकल्लोळ, एकच प्याला, मत्स्यगंधा, सौभद्र, मानापमान, स्वयंवर, विद्याहरण, प्रीतीसंगम, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, ययाती देवयानी, कट्यार काळजात घुसली, राजा हरिश्‍चंद्र, दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, हे बंध रेशमाचे अशी अनेक दर्जेदार संगीत नाटके घोटगेवाडीत सादर झाली. त्यात शंभर वर्षे पूर्ण झालेली अनेक नाटकेही होती.

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या भार्गवराम आचरेकर, कमल बर्वे, अरुण सरनाईक या दिग्गज कलाकारांनीही घोटगेवाडीत भूमिका केली हे विशेष. तात्या पेंटर ऊर्फ पेडणेकर यांनी रंगभूषेची जबाबदारी हसत स्वीकारली होती. पंढरीनाथ देऊलकर अलिकडे रंगभूषेसाठी सहकार्य करतात. विजय मणेरीकर,गोविंद मराठे  संगीतसाथ देतात. घोटगेवाडीतील नाट्यपरंपरेची बडोदा संस्थानानेही दखल घेतली. संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्यासमोर घाडगेवासियांना नाट्यकला सादर करण्याची संधी मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com