माभळेतील ऐतिहासिक विहिरीचे गूढ कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

संगमेश्‍वर - संगमेश्वर तालुक्‍याला शिवकालीन इतिहास आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या तालुक्‍यात अनेक गूढ आकृत्यांचा आजही उलगडा झालेला नाही. माभळे येथील शिवकालीन विहिरीत अशाच गूढ आकृती दिसून येतात. दरवर्षी पाण्यात बुडून या आकृत्यांचे अस्तित्व नष्ट होत असून त्या जतन करण्याची आवश्‍यकता आहे

संगमेश्‍वर - संगमेश्वर तालुक्‍याला शिवकालीन इतिहास आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या तालुक्‍यात अनेक गूढ आकृत्यांचा आजही उलगडा झालेला नाही. माभळे येथील शिवकालीन विहिरीत अशाच गूढ आकृती दिसून येतात. 

दरवर्षी पाण्यात बुडून या आकृत्यांचे अस्तित्व नष्ट होत असून त्या जतन करण्याची आवश्‍यकता आहे. निढळेवाडीच्या व ओझरखोलच्या टोकांवर व माभळे गावाच्या वरच्या सपाट भागात ही शिवकालीन विहीर आहे. ही विहीर जांभ्या दगडांमध्ये कोरलेली आहे. मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी ही विहीर आढळते. पूर्ण जांभ्या दगडात कोरलेल्या या विहिरीचे पाणी कधीही संपत नाही. 

पावसाळ्यात ही विहीर पूर्णपणे भरून वाहते. विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. उन्हाळ्यात मुबलक पाणी असलेल्या या विहिरीचा उपयोग शिवकाळात केला जात होता असे सांगितले जाते. मात्र या विहिरीचे पाणी खाली गेल्यावर विहिरीच्या भिंतीवर अनेक आकृत्या व चित्र दिसून येतात. आतमध्ये कोरलेल्या आकृत्या नक्‍की काय आहेत, याचा अर्थ काय, हे अद्यापही समजू शकलेले नाही.

निढळेवाडीत शिवाजी महाराजांच्या आरमारातील नौका बांधली होती. याचा संबंध या विहिरीशी जोडण्यात येतो. विहिरीच्या आजूबाजूला असलेली सपाट जागा म्हणजेच या ठिकाणी घोडे तसेच हत्तींसाठी दल असावे, असा तर्क काही जाणकार काढतात. विहिरीच्या पायऱ्या म्हणजे घोड्यांना उतरण्यासाठी केलेली जागा आहे, असेही सांगितले जाते. मात्र विहिरीत आकृत्या कसल्या याबाबत कोणालाच काही माहिती नाही. दरवर्षी विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने या आकृत्या नष्ट होण्याची शक्‍यता आहे. 

‘‘ही विहीर पुरातन आहे. याचे आणि आतील आकृत्यांचे जतन होणे गरजेचे आहे. या आकृत्या काय आहेत, ही विहीर इथे कशी खोदण्यात आली, याची उकल व्हावी, यासाठी पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष द्यावे.’’
- दीपक भोसले,
ग्रामस्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mysterious remains of the historic well in Mabhale