सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षपदासाठी 'यांना' संधी

Naik, Bandekar Have Chance Of Sindhudurg ZP President
Naik, Bandekar Have Chance Of Sindhudurg ZP President

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद पुढील अडीच वर्षासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मुंबईत आज राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडत काढण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव झाले असून सत्ताधारी भाजपच्या समिधा नाईक व माधुरी बांदेकर यांना यामुळे संधी निर्माण झाली आहे. तब्बल 17 वर्षांनी हे आरक्षण पडले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्थापनेनंतर आतापर्यंत 29 व्यक्तींनी अध्यक्षपद सांभाळले आहे. यात 23 नियमित तर 6 प्रभारी अध्यक्ष आहेत. एवढ्या कालावधीत 9 महिलांना अध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे. या कालावधीत 20 मार्च 1999 ते 20 मार्च 2002 या कालावधीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी अध्यक्षपद राखीव होते. या कालावधीत वेंगुर्ले तालुक्‍यातील रेणुका लक्ष्मण मयेकर यांनी 20 मार्च 1999 ते 17 एप्रिल 2000 या कालावधीत तर मालवण तालुक्‍यातील शोभा विलास पांचाळ यांनी 26 जून 2000 ते 20 मार्च 2002 या कालावधीत अध्यक्षपद सांभाळले होते. मधला कालावधी माधव भांडारी हे प्रभारी होते. याशिवाय खुला प्रवर्ग महिला राखीव आरक्षण असताना ओबीसी प्रवर्गातील कुडाळ येथील दीपलक्ष्मी पडते या 7 नोव्हेंबर 2013 ते 20 सप्टेंबर 2014 या कालावधीत अध्यक्षपदी विराजमान होत्या.

हे असू शकतात दावेदार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 50 पैकी 7 महिला सदस्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदार संघातून निवडून आल्या आहेत. यात सत्ताधारी भाजप पक्षाकडे या प्रवर्गातून मालवण तालुक्‍यातील सुकळवाड मतदार संघातून माधुरी बांदेकर, वेंगुर्ले तालुक्‍यातील आडेली मतदार संघातून निवडून आलेल्या समिधा नाईक, इन्सुली मतदार संघातून निवडून आलेल्या उन्नती धुरी असे तीन उमेदवार आहेत. तर कणकवली तालुक्‍यातील हरकुळ बुद्रुक मतदार संघातून निवडून आलेल्या राजलक्ष्मी डिचवलकर या अजुन एक सदस्य होत्या; परंतु त्यांनी जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांची साथ धरल्याने त्या सध्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सदस्या म्हणून वावरत आहेत. त्यामुळे त्यांचा विचार या निवडीसाठी भाजपकडून होण्याची शक्‍यता कमीच आहे.

नाईक, बांदेकर यांना संधी

भाजपजवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित असलेल्या मतदार संघातून निवडून आलेले तीन उमेदवार असेल तरी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार आहेत. यात विद्यमान अध्यक्ष संजना सावंत या मुळ नागरिकांचा मागास प्रवर्गातील आहेत. त्यांचे लग्ना पूर्वीचे नाव पूनम ढवण आहे, असे अनेक उमेदवार असेल तरी 17 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ओबीसी महिला आरक्षण पडल्याने याचसाठी आरक्षित असलेल्या मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्यांना भाजप संधी देण्याची शक्‍यता आहे. भाजपकडील माधुरी बांदेकर यांनी सुकळवाड सरपंच म्हणून पाच वर्षे यशस्वी काम केले आहे. त्यांना प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे सौ बांदेकर यांना ही संधी आहे. आडेली मतदार संघातून निवडून आलेल्या समिधा नाईक यांचे मागील अडीज वर्षात विषय समिती सभापती पद हुकले आहे. त्यांचे पती मागील पाच वर्षात सदस्य होते. त्यांनाही या पाच वर्षात कोणत्याच पदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे सौ नाईक यांचाही विचार या निवडीसाठी होवू शकतो.

शिवसेनेकडे तीन उमेदवार
भाजप सदस्य शिवसेनेपासून दुरावले आहेत. भाजपच्या सहा सदस्यांची साथ खासदार नारायण राणे यांच्या गटाला मिळाली आहे; पण कॉंग्रेसने राणे समर्थक 23 सदस्यांना कायद्याच्या कात्रित पकडले आहे. त्यांच्यावर सदस्य अपात्रतेची कॉंग्रेसची खेळी सुरु आहे. या खेळीत कॉंग्रेस यशस्वी झाल्यास शिवसेना सत्तेत येवू शकते. तसे झाल्यास शिवसेनेजवळ वैभववाडी तालुक्‍यातील लोरे मतदार संघातून निवडून आलेल्या पल्लवी झिमाळ, कुडाळ तालुक्‍यातील तेंडोली मतदार संघातून निवडून आलेल्या वर्षा कुडाळकर व घावनळे मतदार संघातून निवडून आलेल्या अनुप्रिती खोचरे हे तीन उमेदवार आहेत.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com