काही शिवसेना नेत्यांमुळे रिफायनरी विरोध बॅकफूटवर

काही शिवसेना नेत्यांमुळे रिफायनरी विरोध बॅकफूटवर

राजापूर - शिवसेनेच्या काही नेत्यांनी समर्थन दिल्याने रिफायनरी विरोधी आंदोलन सुरवातीला बॅकफूटवर पडले होते, अशी जाहीर कबुली शिवसेनेचे माजी सभापती, रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी दिली. याबाबतचा त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. 

रिफायनरी प्रकल्प रद्द करावयाचा असेल, तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असे प्रकल्पग्रस्त ठासून सांगत आहेत. त्याचवेळी कदम यांनी शिवसेनेतील प्रकल्प समर्थकांचा हौशे-नवशे-गवशे असा एकेरीत उल्लेख करीत केलेल्या वक्तव्याने रिफायनरी विरोधाच्या मुद्द्यावरून शिवसेनेतील एकमताबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.  

रिफायनरीच्या विरोधात शिवसेनेने रान उठविले आहे. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांसमवेत आंदोलनामध्ये उतरली. लोकांचे प्रकल्पासंबंधित मत जाणून घेण्यासाठी आलेल्या सुकथनकर समितीसमोरही राऊत, साळवी यांनी रौद्ररूप धारण केले होते. ‘रिफायनरी जाणार, नाणार राहणार’ अशी घोषणा करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी विरोधात रान उठविले. अशी स्थिती असली तरी,

प्रकल्पासंबंधित शिवसेनेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे माजी सभापती कदम यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सेनेच्या सुरवातीच्या भूमिकेबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रिफायनरी रद्द करायची असेल, तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

विरोधकांच्या हाती कोलीत
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने चर्चेला तोंड फुटले आहे. कदम यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ शिवसेना विरोधकांच्या हातात कोलीत ठरण्याची शक्‍यता आहे. त्याआधारे शिवसेनेला टार्गेट केले जाण्याची शक्‍यता आहे.    

प्रकल्पविरोधी समित्यांमध्येही आलबेल नाही
रिफायनरी नको हा मुद्दा असला तरी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्याबाबतीत या व्हिडिओमध्ये केलेल्या वक्तव्याने प्रकल्पविरोधी समित्यांमध्येही ‘आलबेल’ नसल्याचे दिसून येते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com