चिपळुणातील नारायण तलाव गाळातच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

चिपळूण - शहरातील नारायण तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पुन्हा थंडावले आहे. तलावातील गाळ काढण्याच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामास सुरवात करावी, रखडलेल्या कामास गती द्यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. 

चिपळूण - शहरातील नारायण तलावाच्या सुशोभीकरणाचे काम पुन्हा थंडावले आहे. तलावातील गाळ काढण्याच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामास सुरवात करावी, रखडलेल्या कामास गती द्यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. 

नारायण तलाव सुशोभीकरण कामासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पर्यटन योजनेतून ८२ लाखांचा निधी मंजूर केला. सुशोभीकरणाचे धूमधडाक्‍यात भूमिपूजन झाले. कामाला सुरवात झाली आणि ते थांबले. प्रभात रोड फाउंडेशन, तसेच परिसरातील नागरिकांनी पाठपुरावा केला. त्यामुळे कामाला गती आली; मात्र तलावाभोवती बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्यावर ते थांबले. शेजारून जाणाऱ्या नाल्याचे पाणी तलावात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तरीही तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरवात झालेली नाही. दोन महिन्यांवर पावसाळा आल्याने संरक्षक भिंत व गाळ काढणे गरजेचे आहे. नाहीतर आजवर झालेला खर्च वाया जाईल.

तलाव सुभोभीकरणासाठी प्रभात रोड फाउंडेशनसह परिसरातील नागरिक योगदान देत आहेत. शासकीय कामकाजातील अडचणी सोडविण्यासाठी देखील काम करीत आहेत. आपले व्यवसाय, नोकऱ्या सांभाळून येथील नागरिक व महिला नियमितपणे तलावाच्या कामाला भेट देतात. तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी करतात. यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. 

‘‘तलाव गाळाने भरल्याने तेथे पाणी साठत नाही. पावसाळ्यापूर्वी तलावातील झाडी तोडून विनाविलंब तलावातील गाळ निघाला पाहिजे. संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले, तर पुन्हा तलावात गाळ येणार नाही. पावसाचे स्वच्छ पाणी तलावात साचेल. येथील आबालवृद्धांसाठी नारायण तलावाचे सुशोभीकरण जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणूनच येथील जनता कामात सहकार्य करते; मात्र प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून कामात विलंब का होतो हे कोडे उलगडत नाही. ’’

- संतोष इनामदार, सचिव, प्रभातरोड फाउंडेशन

Web Title: narayan lake issue