विमानतळाचे नव्हे, तर टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

कणकवली - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्‌घाटन होणार असल्याचे सांगून शिवसेना-भाजपची मंडळी जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत. विमानतळाचे नव्हे, तर टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन होणार असल्याची टीका खासदार नारायण राणे यांनी येथे केली.

कणकवली - मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्‌घाटन होणार असल्याचे सांगून शिवसेना-भाजपची मंडळी जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत. विमानतळाचे नव्हे, तर टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन होणार असल्याची टीका खासदार नारायण राणे यांनी येथे केली.

आडाळी एमआयडीसीमध्ये रोजगार निर्माण करण्याचीही थाप पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई मारत आहेत. आडाळीत अजून एकही इमारत नाही, कारखाना नाही तर तेथे रोजगार निर्मिती होणार कशी? निवडणुकीच्या आधी शिवसेना-भाजपची मंडळी एकालाही नोकरी देऊ शकत 
नाहीत, असेही ते म्हणाले.

येथील ओम गणेश निवासस्थानी राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, सुदन बांदिवडेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. 

राणे म्हणाले, ‘‘आम्ही चिपी विमानतळाचे काम सुरू केले; परंतु शिवसेना-भाजपला अजूनही ते पूर्ण करता आले नाही. चिपी विमानतळावरून विमान केव्हा उडेल आणि उतरेल हे सांगता येत नाही; मात्र टर्मिनल इमारतीचे उद्‌घाटन करून विमानतळाचे उद्‌घाटन झाल्याचे भासवले जात आहे.

उद्या इमारतीचे उद्‌घाटन होईल. परवा जिन्याचे होईल, अजून कसली कसली उद्‌घाटने करून जनतेला फसवणार आहात? नाणार प्रकल्प रद्द झाला असला तरी आडाळी एमआयडीसीमध्ये प्रदूषण विरहित प्रकल्प आणता आले असते; परंतु बेरोजगारांना रोजगार देण्याची सरकारची मानसिकता नाही. पाच वर्षात आडाळी येथे एकही उद्योग आणता आलेला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर उद्योगमंत्री देसाई, पालकमंत्री केसरकर आडाळी येथे उद्योग उभारण्यासाठी गोव्यातील उद्योजकांना आवाहन करत आहेत.’’ 

नाणार रद्दबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार, रिफायनरी प्रकल्प रद्द केला, याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. कोकणाला उद्‌ध्वस्त करणारा नाणार प्रकल्प होता. तो रद्द झाल्यामुळे तरुणांना रोजगार तसेच नोकऱ्या कशा मिळतील? असा प्रश्न काही मंडळी उपस्थित करीत आहेत. पण, जीवनच सुरक्षित राहणार नसेल तर प्रकल्पात काम कोण करणार? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला.

कोकणातील प्रकल्प ठप्प
राज्य शासनाची महसुली तूट १९ हजार कोटींवर गेली आहे. त्यामुळे राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे. कोकणातील विकास प्रकल्प निधीअभावी ठप्प राहिले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पातही कोकणसाठी भरीव तरतूद झालेली नाही. सिंचन प्रकल्प ठप्प आहेत, असे राणे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Comment