रिफायनरी रद्दचे खरे मानकरी शेतकरीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

राजापूर - प्रकल्पग्रस्तांची एकजूट आणि संघर्षामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे या यशाचे खरे मानकरी नाणार परिसरातील शेतकरी आणि जनता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले. श्रेय लाटण्यासाठी शिवसेनेने आपण जनतेसोबत असल्याचे नाटक केल्याचा आरोपही त्यानी केला. 

नाणार यथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली असून त्याबाबत कोकण रिफायनरी विरोधी संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी दोन दिवस विजयोत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम, अजित यशवंतराव, रवींद्र नागरेकर, विलास पेडणेकर,  हनिफ काझी, अविनाश लाड, नितीन जठार, रामचंद्र भडेकर, दिगंबर गाविलकर, गिरीश मोंडे, नाणार सरपंच ओंकार प्रभुदेसाई, संजय राणे आदी उपस्थित होते. 

कोकणच्या मुळावर येणाऱ्या प्रकल्पांना आपला विरोध असल्याचे आपण यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यातून, वालम यांना लढ्यामध्ये उतरणार असल्याचा शब्द दिला होता. त्याप्रमाणे राणे कुटुंबीय प्रकल्पविरोधी लढ्यामध्ये सहभागी झाले. लोकांनी उभारलेला लढा आणि त्यामध्ये राणे कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याने त्याचे श्रेय राणे यांना जाणार असल्याचे पाहून शिवसेनेने आम्ही जनतेसोबत अशी नौटंकी केल्याचा 
आरोपही त्यांनी केला. 

जनतेच्या संघर्षामुळे हा विजय झाल्याचे सांगत काँग्रेसचे नेते लाड यांनी प्रकल्प रद्दचे श्रेय जनतेला असल्याचे सांगितले. जनतेने प्रकल्पविरोधी उभारलेल्या लढ्याला यश येऊन साऱ्यांचा विजय झाल्याचे वालम यांनी स्पष्ट केले. लोकांनी आयोजित केलेला विजयोत्सव मेळावा होऊ नये याकरीता काहींनी प्रयत्नही केले, मात्र राणे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर परवानगी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narayan Rane Comment