राणेंच्या इन्कारानंतरही अस्वस्थतेचा "किंतू' कायम 

शिवप्रसाद देसाई
शनिवार, 25 मार्च 2017

सावंतवाडी - निवडणुकीच्या राजकारणात कितीही डाउनफॉल सुरू असला तरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची "न्यूजमेकर' म्हणून असलेली ओळख आजही कायम असल्याची प्रचिती पुन्हा आली. अवघ्या चार दिवसांत राणेंनी दोन वेळा आपण शिवसेना किंवा भाजपच्या संपर्कात नसल्याचे जाहीर केले तरी कॉंग्रेसवर त्यांनी केलेली आक्रमक टीका पाहता पक्षांतर चर्चेतील "किंतू' कायम आहे. 

सावंतवाडी - निवडणुकीच्या राजकारणात कितीही डाउनफॉल सुरू असला तरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची "न्यूजमेकर' म्हणून असलेली ओळख आजही कायम असल्याची प्रचिती पुन्हा आली. अवघ्या चार दिवसांत राणेंनी दोन वेळा आपण शिवसेना किंवा भाजपच्या संपर्कात नसल्याचे जाहीर केले तरी कॉंग्रेसवर त्यांनी केलेली आक्रमक टीका पाहता पक्षांतर चर्चेतील "किंतू' कायम आहे. 

राणे हे राजकारणातील वेगळेच रसायन म्हणायला हवे. त्यांचे प्रभावक्षेत्र मुंबईतील काही भाग आणि राज्यात सर्वांत छोटा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. मुंबईच्या राजकीय प्रवाहात गेल्या 20-25 वर्षांत अनेक दिग्गज नेत्यांनी प्रभाव गाजवला. राणे त्यांपैकीच एक. राणेंनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्गचे राजकारण एका रात्रीत भगवा सोडून तिरंगामय झाले. मात्र, लगतच्या रत्नागिरीत फारसा राजकीय फरक दिसला नाही. वास्तविक तो राणेंच्या दृष्टीने राजकीय वैभवाचा शिखरकाळ होता. राणेंनी पक्षातच राहून शिवसेनेवर केलेली टीका आणि त्यानंतर कॉंग्रेस प्रवेश याची दखल राष्ट्रीय स्तरावरील मीडियानेसुद्धा घेतली होता. अगदी बीबीसीनेही ही बातमी दाखविली. राजकीय आक्रमकता आणि कोणालाही शिंगावर घेण्याची क्षमता यामुळे राणे कायमच मीडियाच्या क्षेत्रात न्यूजमेकर म्हणून ओळखले गेले. कॉंग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांनी तब्बल तीन वेळा बंड केले. त्या वेळीही मीडियाने याला भरभरून प्रसिद्धी दिली. 

गेल्या दोन-अडीच वर्षांत मात्र राणेंचा राजकीय "डाउनफॉल' सुरू झाला. सगळ्यात आधी त्यांचे पुत्र डॉ. नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर स्वतः राणे कुडाळमधून पराभूत झाले. पुढच्या काही काळात वांद्रे (मुंबई) येथील पोटनिवडणुकीत राणेंना पराभव पत्करावा लागला. असे असूनही न्यूजमेकर म्हणून त्यांची असलेली ओळख तसूभरही कमी झाली नसल्याचा प्रत्यय गेले चार दिवस सोशल मीडिया आणि त्यानंतर मीडियामध्ये त्यांच्याविषयी सुरू असलेल्या "ब्रेकिंग न्यूज'नी आला आहे. 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांच्यातील राजकीय स्पर्धा 2008 पासून सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाई जगताप, संजय निरुपम अशा कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचा असलेला राजकीय संघर्ष, स्पर्धा या आधीही उघड झाली आहे. राणेंबरोबरच माजी खासदार नीलेश आणि आमदार नीतेश हे त्यांचे दोन्ही पुत्र कॉंग्रेसच्या मुख्य राजकीय प्रवाहात सक्रिय आहेत. त्यामुळे राणेंच्या कोंडीची झळ या दोघांनाही अप्रत्यक्षपणे बसत असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचे राजकारण कायमच मुत्सद्दी असते. राणेंची राजकीय स्टाइल मात्र सरळ आणि आक्रमक असते. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा राणेंनी अनेकदा बोलून दाखविली. कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेतेही उघड नाही; पण छुप्या पद्धतीने अशीच महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. त्यामुळे या दोन्ही राजकीय स्टाइलमध्ये संघर्ष तसा अटळच म्हणावा लागेल. या आधी तीन वेळा राणेंनी कॉंग्रेसविरोधात अशीच आक्रमक भूमिका घेतली; मात्र त्यांचे बंड नंतर थंड झाले. अर्थात, यातील तिन्ही वेळा कॉंग्रेस सत्तेत होता. आता कॉंग्रेस सत्तेतही नाही. उत्तर प्रदेशमधील दारुण पराभवानंतर देशभरातील कॉंग्रेस नेत्यांमधील असुरक्षितता कमालीची वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर राणेंनी घेतलेली आक्रमक भूमिका राजकीयदृष्ट्या अनेक तर्कवितर्कांना तोंड फोडणारी आहे. 

राणे शिवसेना किंवा भाजपचा मार्ग पकडतील अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. अर्थात, हे पर्यायही इतके सोपे नाहीत. राणेंकडून मिळालेल्या कॉंग्रेसमधील चौथ्या बंडाचे संकेत सिंधुदुर्गातील राजकारणाला कोणत्या वळणावर घेऊन जातात याची उत्सुकता आहे. जिल्हावासीयांचे त्यांच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 

काय आहेत शक्‍यता 
* राणे स्वगृही म्हणजे शिवसेनेत परततील ही सोशल मीडियावरील चर्चा खरी मानल्यास सिंधुदुर्गाच्या आणि मुंबईच्या शिवसेनेतील राजकीय वर्तुळावर मोठा प्रभाव पडू शकतो. राणे शिवसेनेत गेल्यास विशेषतः मुंबई महापालिकेवरील स्पष्ट बहुमतासाठी शिवसेनेला आवश्‍यक संख्याबळाची जुळणी करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. भाजपला शह देण्यासाठी आक्रमक नेता शिवसेनेला मिळू शकतो; मात्र राणेंविरोधात यशस्वी लढा देऊन रत्नागिरी-सिंधुदुर्गची लोकसभेची जागा, सिंधुदुर्गातील विधानसभेच्या दोन जागा मिळविणाऱ्या विनायक राऊत, दीपक केसरकर आणि वैभव नाईक या बड्या नेत्यांच्या भूमिकेचा शिवसेनेला विचार करावा लागेल. त्यांचे महत्त्व कायम राहील याची दक्षता शिवसेना पक्षप्रमुखांना घ्यावी लागेल. तसे झाल्यास राणेंना शिवसेना काय देणार, हाही प्रश्‍न आहे. कारण केवळ राणेच नाही, तर नीतेश राणे आणि नीलेश राणे यांनाही पक्षात भक्कम स्थान द्यावे लागणार. सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता हे गणित जुळवणे राणे आणि शिवसेना या दोन्हींच्या पातळीवर कठीण आहे. 

* राणे भाजपमध्ये जातील ही शक्‍यताही चर्चिली जात आहे; मात्र तसे झाल्यास शिवसेना आणि भाजपमधील दुरावा आणखी वाढू शकतो. सिंधुदुर्गात भाजपमध्ये राजन तेली, संदेश पारकर आदी राणेंविरोधात टीका करून बाहेर पडलेले नेते आहेत. कोकणात कॉंग्रेस आणि शिवसेना जितकी सहजतेने लोकांच्या मनात भिनली आहे त्या तुलनेत कमळ फुलविणे कठीण आहे. यामुळे राणेंनी भाजप प्रवेश केला तरी संघटनात्मक बळ उभे करण्यासाठी त्यांना पुन्हा राजकीय संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे ते हा पर्याय निवडण्याची शक्‍यताही कमी आहे. 

कॉंग्रेसमधील शीतयुद्ध... 
* डिसेंबर 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पदावरून बाजूला करण्यात आले. तेव्हा या पदावर राणे यांची वर्णी लागण्याची शक्‍यता होती; मात्र अचानक अशोक चव्हाण यांचे नाव पुढे आले आणि त्यांची संधी हुकली. पक्षाकडून मिळालेला शब्द पाळला गेला नाही, असे सांगत संतप्त राणे यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर कडाडून टीका केली आणि महसूल मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एक तर मी राहीन किंवा कॉंग्रेस राहील, अशी निर्वाणीची भाषादेखील केली होती. कॉंग्रेसचे नेते आपला सेवा दल करायला निघाले आहेत, असाही आरोप राणेंनी केला होता. राणे यांनी केलेल्या आरोपाची दखल घेत 2008 मध्ये कॉंग्रेसमधून त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले. अखेर राणे यांनी नमती भूमिका घेतली. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना पुन्हा फेब्रुवारी 2009 मध्ये मंत्रिमंडळात स्थान दिले. अर्थात, या वेळी त्यांना महसूलऐवजी उद्योगमंत्रिपद देण्यात आले. 

* लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे जुलै 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पद जाणार आणि नारायण राणे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण कॉंग्रेस पक्षाने चव्हाण यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. याच वेळी सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी छाननी समिती जाहीर केली. या समितीतही राणे यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे संतापलेल्या राणेंनी 18 जुलैला मंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली, तसेच त्यांनी 21 जुलैला मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र, त्यांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय झाला नसल्याने राणे अस्वस्थ झाले होते. ते कॉंग्रेस सोडणार अशीच चर्चा त्या वेळी होती. पण प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कृपाशंकर सिंह या दोघांनी राणे यांची ज्ञानेश्वरी बंगल्यावर येऊन मनधरणी केली आणि राणेंनी आपला राजीनामा मागे घेतला. 

* मार्च 2015 मध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण आणि मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती झाल्याने संतप्त झालेल्या नारायण राणे यांनी तिसऱ्यांदा बंडाचा पवित्रा घेतला होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर आपण पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांना पत्र पाठविले होते. या पत्रामुळेच बहुधा आपल्याला डावलले गेले असावे, अशी शक्‍यता राणे यांनी त्या वेळी बोलून दाखविली होती. यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी "ज्ञानेश्वरी'वर राणे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर राणे यांचे कॉंग्रेसमधील तिसरे बंड शमले. या वेळी राणे यांनी कॉंग्रेसने माझा सन्मान राखला जाईल असा शब्द दिला आहे, असे सांगितले. 

Web Title: Narayan rane news maker