राजकीय संघर्ष राणेंची पाठ सोडेना!

शिवप्रसाद देसाई 
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

सावंतवाडी- एखादा नेता आपल्या राजकीय जीवनात जितक्‍या मोठ्या पदांची केवळ कल्पना करू शकतो, तितकी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भूषवली; मात्र तरीही राजकीय संघर्षाने त्यांची पाठ कधी सोडली नाही. शिवसेनेतून काँग्रेसचा स्वीकारलेला पर्यायही त्यांना आगीतून फोफाट्यात नेणाराच ठरला. आता पुन्हा ते राजकीय वळणाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत; मात्र संघर्ष त्यांची पाठ सोडेल अशी चिन्हे मात्र नाहीत.

सावंतवाडी- एखादा नेता आपल्या राजकीय जीवनात जितक्‍या मोठ्या पदांची केवळ कल्पना करू शकतो, तितकी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भूषवली; मात्र तरीही राजकीय संघर्षाने त्यांची पाठ कधी सोडली नाही. शिवसेनेतून काँग्रेसचा स्वीकारलेला पर्यायही त्यांना आगीतून फोफाट्यात नेणाराच ठरला. आता पुन्हा ते राजकीय वळणाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत; मात्र संघर्ष त्यांची पाठ सोडेल अशी चिन्हे मात्र नाहीत.

राणे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेला महिनाभर प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. राणेंनी वेळोवेळी याचा इन्कार केला; मात्र संदिग्धता कायम ठेवली. त्या पाठोपाठ श्री. राणे, आमदार नीतेश राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून जात असल्याचा व्हिडिओ माध्यमांनी व्हायरल केल्यावर चर्लेला बळकटी आली. राणेंनी या दृश्‍याचा इन्कार केला असला तरी पडवे (ता. कुडाळ) येथील काँग्रेसच्या संमेलनात ‘माझा निर्णय महाराष्ट्र, कोकण, सिंधुदुर्गवासीयांच्या हिताचा असेल’, असे वक्तव्य करून पुन्हा संदिग्धतेला वाट मोकळी करून दिली. या एकूणच घडामोडीत राणे राजकीय वळण घेण्याच्या पवित्र्यात असल्याचेही संकेत देत आहेत.

त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सर्वोच्च पदांसह अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. शेकडो पदे वाटली. रंकालासुद्धा एका रात्रीत राजा करण्याची ताकद निर्माण केली; पण संघर्षाने मात्र त्यांची पाठ सोडली नाही. समोर उभ्या ठाकणाऱ्या संघर्षाशी दोन हात करत आपल्या महत्त्वाकांक्षाच्या दिशेने त्यांचा प्रवास कायम राहिला. अनेक समर्थक मागे राहिले, दुरावले, जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनीही विरोधात भूमिका घेतल्या, पक्ष बदलला मात्र राणेंसोबत संघर्ष कायमच राहिला. तो यापुढेही त्यांची साथ सोडेल अशी चिन्हे नाही.

कोणताही राजकीय वारसा नसताना राणेंनी शिवसेनेत पाऊल टाकले. त्यांची क्षमता, संघटनेप्रती समर्पण भावना, आक्रमकता लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांनी त्यांना भरभरून पदे दिली. कणकवलीत ९० च्या दशकात त्यांचा राजकारणात झालेला प्रवेशसुद्धा संघर्षमय राहिला, पण संघर्षांशी मुकाबला करत प्रगतीच्या शिड्या ते वेगाने चढत गेले. शिवसेनेतून त्यांनी थेट काँग्रेसचा रस्ता धरला. तेथेही त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. शिवसेनेत मिळालेली तितकी मोठी पदे संधी असूनही पक्षाकडून दिली गेली नाहीत. यातूनच त्यांनी तीनवेळा पक्षांतर्गत बंड केले. पण नंतर पक्षाशी जुळवून घेतले. आता मात्र काँग्रेसशी असलेला संघर्ष निर्णायक वळणावर आल्याचे चित्र आहे.

मुळात राणेंची जडणघडण शिवसेनेत झाली. शिवसेनेची कार्यपद्धती एखाद्या कुटुंबाप्रमाणे चालते. मातोश्री त्याचे ऊर्जास्थान असते. त्या काळात शिवसेनाप्रमुख आणि आता शिवसेना पक्षप्रमुख यांचा कुटुंबप्रमुखाप्रमाणे शब्द अंतिम मानला जातो. शिवसैनिकासाठी मातोश्रीचे दर्शन घडणे म्हणजे आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना असते. कुटुंब म्हटले की यश पदरात टाकताना वय, ज्येष्ठता यापेक्षाही भावनीक विचार जास्त असतो. शिवसेनाप्रमुखांसाठी सुरवातीच्या काळात नारायण राणे म्हणजे गळ्यातले ताईत होते. राणेही शिवसेनाप्रमुखांमुळेच आपण घडल्याचे कायमच मान्य करतात. यामुळेच राणेंना त्यांची क्षमता लक्षात घेऊन अगदी मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करून मुख्यमंत्रिपद दिले गेले. शिवसेनेतील नव्या पिढीशी नव्या बदलांशी जुळवून घेणे राणेंसाठी कठीण होते. कारण आक्रमक स्वभाव आणि उच्चकोटीची महत्त्वाकांक्षा या त्यांच्या यशाच्या प्रमुख क्षमता होत्या. शिवसेनेतील नव्या बदलांशी जुळवून घेण्यात त्यांच्या महत्त्वाकांक्षा आड आल्या. त्यांनी शिवसेनेचे कुटुंब सोडून अनेक वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस संघटनेची वाट धरली.

काँग्रेसची कार्यपद्धती कुटुंबाप्रमाणे नव्हे तर संघटनेप्रमाणे चालते. त्यात तुम्ही किती ज्येष्ठ, तुमच्या पक्षाशी निष्ठा किती जुळलेल्या आहेत, हायकमांड, वरिष्ठ नेत्यांची तुमच्यावर मर्जी आहे का आणि काँग्रेसी पद्धतीचे लॉबींग टायमिंग साधून करता येते का यावर पदे ठरतात. आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी राणेंसाठी दिल्ली दरबारातून हलणारी ही संघटना अंगवळणी पाडून घेणे तितकेसे सोपे नव्हते. त्यांनी तसा प्रयत्नही केला. मात्र त्यांची मुस्कटदाबी कायम राहिली. अधूनमधून त्यांच्यामधला आक्रमकपणा उफाळून यायचा. मात्र बाहेर फारसे राजकीय पर्याय खुले नव्हते. त्यातच नव्या पिढीला राजकारणात स्थिर स्थावर करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर होते. त्यांनी काँग्रेसशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मूळ राजकीय स्वयंभू स्वभाव लक्षात घेता या जुळवून घेण्यालाही मर्यादा होत्या. लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाला आक्रमक नेतृत्व म्हणून राणेंकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र उलट राणेंचे महत्त्व कमी करण्याचे छुपे प्रयत्न केले गेले.

आता ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. तसे झाले तरी राणेंसाठी भाजपमधला संभाव्य राजकीय प्रवासही सुकर असण्याची शक्‍यता कमी आहे. काँग्रेसने राणेंना सिंधुदुर्गातील राजकीय निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र दिले होते. भाजपकडून तसे होण्याची शक्‍यता कमी आहे. कारण भाजपची संघटनात्मक रचना काँग्रेसपेक्षाही क्‍लिष्ट आहे. काँग्रेसमध्ये शेवटचा निर्णय हायकमांडकडे असतो. भाजपमध्ये संघाची भूमिका महत्त्वाची असते. संघ म्हणजे एक व्यक्ती नव्हे तर वैयक्तिक स्वार्थ, महत्त्वाकांक्षा नसणारा ‘थिंक टॅंक’ असतो. तेथून होणारे निर्णय उद्याच्या यशापेक्षा खूप पुढच्या भविष्याचा विचार करणारे असतात. यामुळे भाजपमध्ये ‘पेशन्स’ असणाऱ्यांनाच या संघटनेची कार्यपद्धती समजते. राणेंना भाजपमध्ये जायचे असेल तर केवळ त्यांच्याच नाही तर सोबत येणाऱ्यांच्या राजकीय भविष्याचाही विचार करावा लागणार आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये अर्थातच माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्यासह सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, जिल्हा बॅंक आदी सत्तास्थानांवर असणाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय पक्षात यायच्या आधीच सध्या भाजपमध्ये असणाऱ्यांनी संघर्षाचे संकेत द्यायला सुरवात केली आहे. ते भाजपमध्ये गेल्यास शिवसेना कशी प्रतिक्रिया देणार हाही मुद्दा आहे. आता हा संघर्ष इतका पुढे गेला आहे की काँग्रेसमध्ये राहूनही पक्षात आणखी भक्कम स्थान मिळविणे त्यांच्यासाठी कठीण आहे. या सगळ्याचा विचार करता पुढच्या काळातही राजकीय संघर्ष राणेंची पाठ सोडेल अशी चिन्हे नाहीत.

Web Title: narayan rane political struggle