जठार, चव्हाणांची कुंडली बाहेर काढणार - नारायण राणे

narayanrane
narayanrane

कणकवली - प्रथमेश तेली यांच्यावर झालेल्या हल्ल्यात नीतेश राणे यांचा संबंध जोडून भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्वच विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. येत्या काळात या सर्वांच्या कुंडल्या जनतेसमोर मांडणार आहे. दलाली करणारे चिटर आणि समाजातील ओवाळून टाकलेले लोक भाजपने घेतले आहेत, अशी टीका कॉंग्रेस नेते आमदार नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

ओम गणेश निवास्थानी आयोजित या पत्रकार परिषदेला आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. श्री. राणे म्हणाले, ""जिल्ह्यात शिवसेना-भाजपने काय विकास गंगा आणली ते सांगावे. निवडणुकीपूर्वी जी आश्‍वासने दिली होती, त्यातील सी वर्ल्ड प्रकल्प बंद आहे. विमानतळ अद्याप सुरू नाही. दोडामार्गची एमआयडीसीसाठी भूसंपादन नाही. एकही विकासकाम झाले नाही. त्यामुळे विकासाबद्दल बोलण्याचा या मंडळींना अधिकारच नाही. राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याला मारहाण झाली. त्याने आतापर्यंत काय गुण उधळले आहेत? त्या घटनेशी नीतेश राणे याचा काही संबंध नाही. या मारहाणीत संदेश पारकर, वैभव नाईक यांची नावे सुरवातीला घेतली होती. त्या मुुलाला आतापर्यत किती वेळा मार पडला. सगळी प्रकरणे आम्हाला खुली करावी लागतील. कुणाच्या मुलाला मारून आम्हाला काय मिळणार? या प्रकरणाबाबत तेली एक माहिती देतात आणि जठार दुसरेच सांगतात. जठारांनी प्रथम काही तरी करावे; मग राणेंवर बोलावे. मुंबईत केवळ टक्केवारीवर जगणारा माणूस आहे. अजून मी काही त्याच्यावर बोललो नव्हतो. राज्यमंत्री म्हणून मिरवणाऱ्या रवींद्र चव्हाण यांनी आपली उंची तपासावी; मग बोलावे. डोंबिवलीत काय धंदा करतात याची माहिती माझ्याकडे आहे. चव्हाणांची प्रतिमा मी अधिवेशनात मांडणार आहे.'' 

भाजप हा गुंडांचा पक्ष आहे, या आरोपाचा पुनरुच्चार करून श्री. राणे म्हणाले, ""ज्यांना आम्ही आणि समाजाने नाकारले अशांना घेऊन भाजपवाले मुख्यमंत्र्यांपर्यत जात आहेत. राणेंच्या जिल्ह्यातील माणूस म्हणून मुख्यमंत्री त्यांच्या गळ्यात शाल घालत आहेत. दीपक सांडव यांची मुंबईतील पार्श्‍वभूमी तपासा. जे भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत आहेत ते टक्केवारीवर आणि भ्रष्टाचारावर जगणाऱ्यांना पक्षात घेत आहेत.'' 

श्री. राणे म्हणाले, ""पालकमंत्री दीपक केसरकर प्रत्येक वेळी कोट्यवधी रुपये आणले असे सांगतात. या निधीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली. ती अद्याप मिळालेली नाही. ज्यांची सरपंच व्हायची लायकी नाही, असे पालकमंत्री विकास काय करणार? केवळ सत्तेसाठी एकत्र येऊन जनतेची दिशाभूल करून निवडून येतात. याही पुढे तेच करू पाहत आहेत. हेवेदावे संपवून लोकांच्या विकासाची कामे करा.'' 

उमेदवार यादी आज 
जिल्हा परिषदेत स्वबळावर लढण्याची कॉंग्रेसची तयारी आहे. आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शनिवारी (ता. 21) उमेदवारांची नावे जाहीर करू; परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकत्र येण्याचा विचार केल्यास आम्हीही सहकार्य करू. कारण समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा आमचा विचार आहे, असे एका प्रश्‍नाला उत्तर देताना राणे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com