ठेकेदारीतले भागीदार आमदार चालतात कसे?- राणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

ज्यांना गेली अनेक वर्षे नगराध्यक्ष पद उपभोगण्यास दिले त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा दिसून आली आहे. मुंबईला राहून शहराचा विकास कसा काय होणार याचा येथील जनतेने विचार करावा. सर्व काही मलाच हवे सांगणे कितपत योग्य आहे. शहरात एकच कुटुंब आहे का? अन्य कार्यकर्त्यांनी पुढे जायचे नाही का? जिल्ह्यातील तिन्ही पालिका आणि देवगड नगरपंचायतीवर कॉंग्रेसचीच सत्ता येईल.
- नारायण राणे, आमदार

मालवण- किनारपट्टीवरील हजारो मच्छीमारांचे प्रश्‍न गेल्या दोन वर्षात कायम आहेत. विकासाच्या गप्पा मारणारे स्थानिक आमदार हे पर्यटनासह अन्य विकासकामांमधील ठेकेदारांचे भागीदार आहेत. रस्त्यांसह अन्य कामांचे ठेकेही जर लोकप्रतिनिधींकडून घेतले जात असतील तर सर्वसामान्यांनी काय करायचे? असे लोकप्रतिनिधी तुम्हाला चालतात का? असा प्रश्‍न करत आमदार वैभव नाईक यांच्यावर कॉंग्रेसचे नेते आमदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली.

हे सर्व चित्र बदलण्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कॉंग्रेस आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सतराही उमेदवारांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहनही श्री. राणे यांनी यावेळी केले.
येथील दौऱ्यावर आलेल्या श्री. राणे यांनी आज दांडी प्रभागात मच्छीमारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, अशोक सावंत, मेघनाद धुरी, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिती पाताडे, मंदार केणी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक पाटकर, सुहास हडकर, रमेश तोडणकर, बाबा परब, संतोष आचरेकर, गौरव प्रभू, लीलाधर पराडकर, सुनीता चव्हाण, चारुशीला आचरेकर यांच्यासह मच्छीमार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, ""किनारपट्टीवरील सर्वच मच्छीमारांनी 1990 पासून मला साथ दिली आहे. सर्व मच्छीमार समाज सक्षम तसेच आर्थिक दृष्ट्या सधन बनला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. पारंपरिक, पर्ससीनधारक यांच्यातील संघर्षात मी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. कारण दोन्ही मच्छीमार हे माझेच आहेत. त्यामुळे त्यांच्यातील वाद मिटावेत यासाठीच माझे प्रयत्न राहिले. मात्र मी पर्ससीनधारकांचे समर्थन करत असल्याचा गैरसमज पसरविण्यात आला. आगामी काळात सर्वसामान्यांसह मच्छीमारांच्या पाठीशी ठाम उभे राहत त्यांच्या सर्वांगीण विकासाकडेच लक्ष दिले जाईल.''

ते म्हणाले,""नगराध्यक्ष, नगरसेवक ही पदे जनतेच्या विकासासाठी आहेत. त्यामुळे लोकांच्या पैशावर आपली घरे बांधण्याची स्वप्ने कुणी पाहू नयेत. प्रभागात काही जणांकडून समाजाचे राजकारण केले जात आहेत. मी जात, पात मानत नाहीत. माणुसकी हाच माझा धर्म आहे. त्यामुळे समाजाचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. पालिका निवडणुकीत राज्यातील भाजप नेत्यांना सिंधुदुर्गात यावे लागते यातच भाजपचा पराभव दिसून येत आहे.''

ज्यांना गेली अनेक वर्षे नगराध्यक्ष पद उपभोगण्यास दिले त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठा दिसून आली आहे. मुंबईला राहून शहराचा विकास कसा काय होणार याचा येथील जनतेने विचार करावा. सर्व काही मलाच हवे सांगणे कितपत योग्य आहे. शहरात एकच कुटुंब आहे का? अन्य कार्यकर्त्यांनी पुढे जायचे नाही का? जिल्ह्यातील तिन्ही पालिका आणि देवगड नगरपंचायतीवर कॉंग्रेसचीच सत्ता येईल.
- नारायण राणे, आमदार

Web Title: narayan rane questions contractors in politics