विकासात सिंधुदुर्गची अवस्था दयनीय ः राणे

 Narayan Rane spoke about the problems of Sindhudurg
Narayan Rane spoke about the problems of Sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - वादळाने नुकसान झालेल्यांना भरपाई मिळालेली नाही. भात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत दिलेली नाही. दरवर्षी येणारा विकासाचा फंडदेखील आला नसल्याने विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्गची दयनीय अवस्था ठाकरे सरकारने केलेली आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली. तसेच कोरोनाच्या संसर्गवाढीलादेखील ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. 

येथील आपल्या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यात त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. श्री. राणे म्हणाले, ""राज्यातील सरकार हे "मातोश्री'च्या पिंजऱ्यामधील सरकार आहे. लोकोपयोगी कोणतेही निर्णय या सरकारला घेता आलेले नाहीत. केवळ लॉकडाउन करून हे बंद, ते बंद करणं एवढंच काम हे सरकार करतंय. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणं किंवा विकासकामं सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही.'' 

श्री. राणे यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. ते म्हणाले, ""जिल्हा नियोजन सभेत कामं निश्‍चित केली जातात आणि सभा संपल्यानंतर परस्पर ही कामं बदलली जातात. वस्तुतः कामं बदलायची असतील तर तसा प्रस्ताव सभागृहात मतदानासाठी टाकावा लागतो. पण सर्व नियम धाब्यावर बसवून इथले पालकमंत्री काम करत आहेत.'' 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडी कारवाईबाबत आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे श्री. राणे म्हणाले. खरं तर अशा प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रतिक्रिया द्यायची नसते; मात्र मीडियाने या सर्व प्रकरणाची पूर्ण माहिती घ्यावी. कारवाई योग्य की अयोग्य हेही दाखवावे. त्यानंतरच आपण या विषयावर प्रतिक्रिया देऊ. तसंच सरनाईक हे कुणी साधूसंत नाहीत, असेही श्री. राणे म्हणाले. राज्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक, विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करायला हव्या होत्या. तसे न करताच शाळा सुरू झाल्या तर कोरोना संसर्गाचा धोका वाढणार आहे आणि या सर्वाला ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचेही श्री. राणे म्हणाले. 
 

- संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com