'राणे कुटुंबियांना असंतुष्ट राजकारणी म्हणून पुरस्कार द्यायला पाहिजे'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

राणे कुटुंबियांना असंतुष्ट राजकारणी म्हणून पुरस्कार द्यायला पाहीजे. गिनीज बुकात नोंद होण्यासारखी त्यांची पात्रता नाही, अशी टिका शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.

सावंतवाडी:  राणे कुटुंबियांना असंतुष्ट राजकारणी म्हणून कोणी तरी आता पुरस्कार द्यायला पाहीजे. गिनीज बुकात नोंद होण्यासारखी त्यांची पात्रता नाही, अशी टिका शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.

मुुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाचे औचित्यसाधुन आज खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही दिवसापूर्वी आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आपण राज्य सरकारचा पाठींबा काढून घेणार असल्याचा वारंवार दावा करीत असल्यामुळे त्यांची नोंद गिनीज बुकने घ्यावी अशी मागणी केली होती. याबाबत राऊत यांनी नितेश राणेंसह राणे कुटुंबाचा समाचार घेतला. यावेळी राऊत म्हणाले, “राणे कुटुंबियांना असंतुष्ट राजकारणी म्हणून पुरस्कार देवून कोणी तरी त्याचा सत्कार केला पाहिजे. या राणे फॅमिलीचे कधीच कोणाशी पटले नाही. शिवसेनेत असताना ते असंतुष्ट होते. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी राहुल गांधीवर टीका केली. त्यानंतर विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे त्यांच्या टीकेतून सुटले नाहीत. त्यामुळे आता त्यांची शेवटची इच्छा भाजपात जायची राहीली आहे. त्यामुळे अजुन त्यांनी मोदीवर टिका केलेली नाही हे नवल आहे. त्यामुळे अशा माणसाबाबत काय बोलावे असा प्रश्‍न आहे.” 

महामार्गाच्या कामावरुन शिवसेना, भाजपात श्रेयवाद रंगला आहे. याबाबत राऊत यांना छेडले असता ते म्हणाले, “1968 पासून या महामार्गाचे काम रेंगाळलेले आहे. तत्कालीन कोकणचे कार्यसम्राट म्हणणार्‍या अनेकांना हा महामार्ग चौपदरी करायला जमलेले नाही, असे असताना माझ्या काळात मी वारंवार पाठपुरावा केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शब्द टाकला आणि हे काम मार्गी लागले. त्यामुळे याबाबत आता कोण काय बोलते, कोण श्रेय घेते हे महत्वाचे नाही. लोकांनी आपल्या जमिनी या महामार्गासाठी दिल्या आणि काम पुर्ण होण्यासाठी तेच आमच्या पाठीशी राहीले. त्यामुळे खरे श्रेय त्यांचेच आहे”

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, अशोक दळवी, सागर नाणोसकर, गुणाजी गावडे आदी उपस्थित होते.

झाराप-पत्रादेवी महामार्ग कामाची चौकशी करणार
तीस लाख रुपये खर्च करुन नुकतेच काम करण्यात आलेल्या झाराप-पत्रादेवी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तब्बल दोन वेळा खड्डा पडला आहे. दोन दिवसापूर्वी पडलेला खड्डा शिवसैनिकांनीच दाखवून दिला. याबाबत राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, “या महामार्गाच्या कामाची चौकशी करण्यात येणार आहे. आणि काम निकृष्ट झालेले आढळून आल्या संबधित ठेकेदार आणि तत्कालीन अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.” 

Web Title: Narayan rane vinayak raut esakal news