नरडवे प्रकल्पग्रस्तांनी मुंबईतील बैठकीत का केला विरोध ?

Nardave Dam Affected Oppose In Mumbai Meeting
Nardave Dam Affected Oppose In Mumbai Meeting

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत यंदा धरणाचे काम सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली झाल्या होत्या; मात्र मुंबईत प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत धरणाचे काम सुरू करण्यास प्रखर विरोध करण्यात आला. प्रथम पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करा मगच प्रत्यक्षात कामाला सुरुवात करा, अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

धरण प्रकल्प गेली काही वर्षे बंद स्थितीत आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, शेत जमीन, वाढीव मोबदला, प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे सर्वेक्षण अशा विविध 10 ते 15 मागण्या प्रकल्पग्रस्तांनी ठेवल्या आहेत. गेली काही वर्षे याबाबत वारंवार मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केला होता. दोन- तीन वेळा कामही बंद पडले, त्यानंतर गेले काही दिवस हे काम बंद होते. यंदा पंतप्रधान सिंचन योजनेतून केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी राज्य सरकारकडे प्राप्त झाले आहे. कोकण सिंचन महामंडळाला निधी वेळेत खर्च करणे बंधनकारक आहे. हा निधी खर्च करण्यासाठी केंद्राने हिरवा कंदील आहे. अलीकडे केंद्रीय सिंचन प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांनी नरडवे धरण प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाला प्राप्त झालेला निधी खर्च करण्यात त्यांनी अनुमती दर्शविली होती. या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त कृती समितीची बैठक जिल्हा मुख्यालयात झाली होती. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्यावतीने विविध मागण्या पुढे करण्यात आल्या होत्या. या मागण्या वेळेत सोडवल्या जातील असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून नरडवे धरण प्रकल्पाच्या कामाला अर्थात साफसफाईला सुरुवात झाली होती.

जळगावच्या कंपनीला धरणाचा ठेका

नरडवे धरण प्रकल्पाच्या जुन्या ठेकेदाराने हे काम सोडल्यानंतर दोनशे कोटीचा ठेका जळगावच्या एका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीने आपली सगळी यंत्रणा नरडवे धरण प्रकल्पाच्या स्थळी आणून ठेवलेली आहे. या कंपनीने तूर्तास साफसफाईचे काम सुरू केले आहे. धरणाच्या प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. धरणाचे मातीकाम होऊ देणार नाही अशी भूमिका आता मुंबईतील बैठकीत घेण्यात आली आहे. 

...तर काम बंद पाडण्याचा इशारा 

या बैठकीचा तपशील समजू शकलेला नाही; मात्र येत्या आठवड्यात मुंबईतील धरणग्रस्त कुटुंबीय गावात येऊन काम सुरू झाल्यास तत्काळ ते बंद पाडतील; मात्र अद्याप तरी नरडवे प्रकल्पाच्या माती कामाला सुरुवात झालेली नाही. जोपर्यंत धरणग्रस्तांच्या आजवरच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत धरणाचे काम एक इंचही करू देणार नाही, अशी भूमिका मुंबईतल्या मीटिंगमध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही धरणाचे काम रखडण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com