अवघ्या तीन तासांत शाळा रेडी टू टीच ; गावाने श्रमदानातून केली उभी शाऴा...

शनिवार, 27 जून 2020

उध्वस्त शिपोळे शाळा गावामुळे रेडी टू टीच ग्रामस्थ, महिलांचे श्रमदान; कौले, कोणे दुरुस्ती; वर्ग खोल्या केल्या स्वच्छ

मंडणगड (रत्नागिरी) : तालुकाभरातील जवळपास १००% शाळा निसर्ग चक्रीवादळात उध्वस्त होऊन गेल्या आहेत. पंचनाम्यानंतर शासकीय मदतीची वाट पाहत असताना शिपोळे नं. १ येथील ग्रामस्थ व महिला मंडळाने मात्र शाळेसाठी सदैव तत्पर हा आपला बाणा पुन्हा एकदा सिद्ध केला. गावाने श्रमदानातून उध्वस्त शाळेची इमारत दुरुस्ती करून शाळा रेडी टू टीच करण्यात आली. यासंदर्भात शाळेचे पदवीधर शिक्षक पुंडलिक शिंदे यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला.

३ जून ला अवघ्या उत्तर कोकण किनारपट्टीवर धुमशान घालणाऱ्या निसर्ग चक्रीवादळात शिपोळे गावठाणातील घरे, वाडे याचबरोबर शालेय कौलारू इमारतीचीही पडझड झाली. कौले, कोने, वाशिक सामान, रिपा, खिडक्यांच्या झडपा, दरवाजे असे जवळपास ४४,८००/- रुपयांचे नुकसान झाले. तसेच लगतच्या सिमेंट छप्पराच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ८५,०००/- खर्च अपेक्षित आहे. मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी तसेच सर्व शिक्षा अभियानच्या जेई मार्फत रितसर पंचनामे झाले. पंचायत समिती मंडणगडचे अभियता श्री. सपकाळे यांनी आवाहन केले की शासाकिय मदत मिळेल, पण तोवर वाट न बघता ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा आणि उधार उसनवार करुन का होईना, साहित्याची जमवाजमव करून इमारत सुस्थितीत आणावी.

हेही वाचा - सिंधुदुर्गातील धबधबे, निसर्ग तुम्हाला खुणावतील़ पण तेथे जाता येणार नाही.....काय आहे कारण वाचा
 

ग्रामस्थांनीही विचार केला की पावसापाण्याचे दिवस आहेत, जेवढा उशीर तेवढं नुकसान वाढत जाणार आणि मग ठरलं! बघताबघता गाव एक झाला. ग्रामस्थ, पालक यांत माजी विद्यार्थी, मुंबईकर चाकरमानी यांनी मिळून दुरुस्तीचा आढावा घेतला. लागणारी कौले, कोने गावातून परतफेडीच्या बोलीवर घेतली, बेंडशॉवर जाऊन रिपा, वासे घेतले आणि शेकडो हात राबू लागले. मग गतस्मृतीना उजाळा देत शाळा सावरू लागली. वयस्कर, प्रौढ, तरुण माजी विद्यार्थी आपापले अनुभव शेअर करू लागले.

हेही वाचा - कोरोनाचा कहर : जिल्ह्यात एका रात्रीत वाढले 35 कोरोनाबाधित,  कुठे ते वाचा....

दरवाजे, खिडक्या, झडपा तात्पुरत्या स्वरूपात पक्क्या केल्या गेल्या. पुष्करणी संपूर्ण उपसून स्वच्छ केली गेली, बांधबंदिस्ती करण्यात आली, सिमेंट छप्पर हे मोठं आर्थिक काम असल्याने ते नंतर करण्याचे ठरले. त्यानंतर गावातील तमाम महिला मंडळाने संपूर्ण दिवसभर खपून संपूर्ण वर्गखोल्या धुवून, साफसफाई करुन शाळा लखलखीत केली. शालेय कार्यालय, पोषण आहार कोठी सुद्धा चकाचक करण्यात आली.

हेही वाचा -असे होते राजर्षींचे झीरो पेंडन्सी प्रशासन...... -

अवघ्या तीन तासांत शाळा पहिल्यासारखी
  अवघ्या तीन दिवसांत शाळा पुन्हा पहिल्यासारखी झाली, चक्रीवादळात पडझड झालेली हीच का ती शिपोळे शाळा ? असा प्रश्न पडावा! सर्वांच्याच चेहेऱ्यावर एक अपूर्व आनंद आणि कर्तव्यपूर्तीचे समाधान ओसंडून वहात होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मानसी जगताप, मुख्याध्यापक शरद जगताप यांनी सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळाचे आभार मानले. शाळेला गावाचा ठाम आधार असल्यानेच हे शक्य झाल्याचे मत पदवीधर शिक्षक पुंडलिक शिंदे यांनी व्यक्त केले. नुकतीच उमरोली केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा शिपोळे नं.१ शाळेत पार पडली. केंद्रीय प्रमुख श्री. पटेल आणि केंद्रातील उपस्थित विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनीही ग्रामस्थ आणि महिला मंडळाच्या तत्पर योगदानाबद्दल प्रशंसा केली.