‘नवरंग’ने दिली मॉन्सूनच्या आगमानाची चाहूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असा स्थलांतराचा प्रवास करणारा नवरंग (इंडियन पिट्टा) पक्ष्याचे एप्रिलमध्ये आगमन होते. या पक्ष्याला मॉन्सूनच्या आगमनाची चांगलीच पूर्वचाहूल लागते. याच्या आगमनानंतर महिनाभरात मॉन्सूनचे आगमन होते. सध्या या पक्ष्याचे आगमन झाले असल्याने मॉन्सूनही लवकरच येण्याचे संकेत मिळत आहेत.
-धनंजय मराठे, पक्षीमित्र

राजापूर - मॉन्सूनचे आगमन आणि निर्गमनात गेल्या काही महिन्यांत सातत्याने बदल झालेला असून, मॉन्सूनचे आगमन आणि निर्गमनाचे वेळापत्रकच बदलले आहे. त्यामुळे वेधशाळेचे अंदाजही अनेकदा चुकीचे ठरत आहेत. अशा स्थितीत मॉन्सूनच्या आगमनाची साऱ्यांना ‘ॲडव्हान्स चाहूल’ देणाऱ्या नवरंग पक्ष्याचे कोकणात आगमन झाले आहे. त्यामुळे यावर्षी लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार असल्याच्या वेधशाळेच्या वृत्ताला एकप्रकारे दुजोरा मिळत आहे. 

श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असे स्थलांतर करणारा नवरंग मान्सूनचा अंदाज येताच भारतामध्ये विशेषतः कोकणामध्ये येतो. मैनेएवढा भडक रंगाचा आणि भुंड्या शेपटीचा हा पक्षी रंगाने हिरवा आहे. निळा, तांबूस, काळा आणि पांढरा असा वरच्या अंगाचा रंग असून पोट आणि शेपटीचा खालचा भाग किरमिजी रंगाचा असतो. 

वस्तीजवळ वा ओढे, नाले यांच्या सभोवतालच्या दाट झुडूपांमध्ये सर्रासपणे आढळतो. मे ते ऑगस्ट हा त्याच्या विणीचा हंगाम आहे. गवत, काटक्‍या, वाळलेली पाने आदींपासून मोठे गोलाकार घरटे जमिनीवरील झुडपाच्या बुंध्याशी वा झाडावर हा बांधून त्या ठिकाणी नवजीवांना जन्म देतो.

नवरंगचे शिटी वा ओरडण्यामधील ग्रुपिंग अनाकलनीय
नवरंग पक्षी ओरडण्यापूर्वी ताठ बसून डोके मागे झुकवून मग जोरात ओरडतो. एका पक्ष्याने विशिष्ट आवाज काढल्यानंतर वा शिटी वाजविल्यानंतर त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या दिशांना असलेले नवरंगचे जातभाई तशाचप्रकारचा आवाज काढून एकमेकांना प्रतिसाद देतात. 

नवरंगच्या या जातभाईंचा शिटीमधील हे ग्रुपिंग अनाकलनीय असते. त्यांची ‘व्ही ट्यमू व्ही ट्यू’ ही सुरेल शीळ आसमंत दुमदुमून टाकत आहे. 

श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असा स्थलांतराचा प्रवास करणारा नवरंग (इंडियन पिट्टा) पक्ष्याचे एप्रिलमध्ये आगमन होते. या पक्ष्याला मॉन्सूनच्या आगमनाची चांगलीच पूर्वचाहूल लागते. याच्या आगमनानंतर महिनाभरात मॉन्सूनचे आगमन होते. सध्या या पक्ष्याचे आगमन झाले असल्याने मॉन्सूनही लवकरच येण्याचे संकेत मिळत आहेत.
- धनंजय मराठे,
पक्षीमित्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navrang Indian Pitta bird seen in Konkan tells Monsoon Arrive within month