बांद्यातील महास्वच्छतादूत बहुमान मिळवणारी दुर्गा

निलेश मोरजकर
Saturday, 24 October 2020

आयुष्यभर स्वातंत्र्य लढा देणार्‍या

तेंडोलकर बाईंचा प्रवास ः स्वच्छतेपासून शिक्षणापर्यंत कार्य

बांदा (सिंधुदुर्ग) : देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षीच जन्म झाला. यामुळे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होता आलं नाही; मात्र त्यानंतर अनेकांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून सतत झटपटाव लागल. विशेषत: अनेक महिलांना ते मिळवूनही दिल. समाजातील मागास घटकांना सार्वजनिक पाणवठ्यावरून पाणी मिळविण्याच्या हक्कापासून ते स्वच्छता आणि शिक्षणापर्यंत अनेक पातळीवर ते मिळवून दिले. ही लढाई बांद्यातील सुहासिनी रुपाजी तेंडोलकर म्हणजेच सर्वांच्या तेंडोलकर बाई आजही लढत आहेत. त्यांचे आयुष्य म्हणजे अनेक घटनांनी भरलेले आदर्श असं महाकथानकच आहे. दुसर्‍यासाठी जगण्याचं त्यांच ब्रीद आज वयाच्या या टप्प्यातही त्या जपत आहेत.

बांद्यातील वाफोली रोडवर जर सकाळ- सायंकाळ कचरा कुचरा दिसला तर या रस्ताने नियमित ये-जा करणारे लोक थांबून चौकशी करतात,तेंडोलकरबाई कुठे गेल्या? एवढं हे गणित बनलं आहे. तेंडोलकर यांची ओळख महास्वच्छतादूत अशीच बनलीय जणू. रोज सकाळी उठून आपल्या घराजवळचा एसटीचा रस्ता दुपारपर्यंत साफ करणं हा जणू त्यांचा छंदच! वयाला झेपेल तेवढं दुपारपर्यंत जात त्या साफसफाई करतात. कचर्‍याचे व्यवस्थापन झाले की नंतरच त्या आपल्या दैनंदिन कामाला लागतात. हा त्यांचा नित्यक्रम आता तेथून नियमित ये-जा करणार्‍यांना माहिती झाला आहे. विविध प्रकारच्या झाडांमधून हा रस्ता जात असल्याने त्यांची पाने पडतच राहातात. त्या चार-पाच दिवस त्यांच्या मुळ गावी तेंडोली येथे गेल्या की इकडे कचरा जमा होतो, मग लोकांना लक्षात येत, की बाई नाही आहेत, स्वच्छतेचा खरा पुरस्कार तेंडोलकर बाईंना द्यायला हवा, मात्र त्यांनी कधीही पुरस्कारासाठी काम केले नाही. आज कोरोना महामारीच्या काळात स्वच्छतेचे महत्व सर्वानाच पटत आहे. पण तेंडोलकर बाईंनी कुठल्याही महामारीची वाट पाहिली नव्हती. त्यांना स्वच्छतेचे महत्व माहिती असल्यानेच त्यांनी हाती खराटा घेतला होता.

हेही वाचा- साहेब ते संरक्षक भिंतीच काम कधी होणार ? दोन महिने झालं आम्ही नातेवाईकांकडेच राहतोय -

मनाची शुद्धता, मनाची स्वच्छता ही सर्वात मोठी. तेंडोलकर बाईंचे आयुष्य म्हणजे या मनाच्या शुद्धतेचे एक मोठे उदाहरणच आहे. त्याकाळी युनिसेफतर्फे अंगणवाड्या चालविल्या जायच्या. यात अंगणवाडी सेविका म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळवली या दुर्गम गावातून त्यांनी कामाला सुरुवात केली. कोळवलीतील लोक आजही त्यांची आठवण काढतात ती त्यांच्या मायाळू स्वभावामुळेच. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर दोन लहान मुलांना घेवून दुर्गम भागात त्या राहत होत्या. पण काही वेळातच आजुबाजूची सर्व माणस त्यांच्या कुटूंबाचा हिस्सा बनली. गावात गरीबी होतीच, त्यांना बाईंचा आधार वाटू लागला.

दुसर्‍याला आधार देणे हा गुण त्यांचा उपजतच असावा. मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यातील दुर्गम भागात त्यांनी काम केलं. हे काम करत असताना सामाजीक कामातही त्या नेहमीच पूढे राहिल्या. त्यांनी वेळोवेळी दुसर्‍यांसाठीच लढा दिला. त्यानीच स्थापन केलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून तर त्यांनी अनेक सासरवासीन मुलींचे जीव वाचविले आणि संसारही थाटून दिले.

बांदा-मुस्लिमवाडी येथील फमिदा शेख यांची साथ त्याना नेहमीच मिळायची. या दोघींनी मिळून दोन गरिब मुलींची सासरी होणार्‍या छळापासून मुक्तता करत त्यांचे संसार नव्याने उभे करून दिले होते. त्याचबरोबर अनेक अनाथ, गरजू, अपंग महिला-पुरुषांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठीही तेंडोलकर बाईंनी सतत धडपड केली. अनेकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला, अनेक वृद्धांना वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवून दिला. घरे मिळवून दिली. कोणतेही सरकारी किंवा सार्वजनिक पद नसताना अनेक आयुष्य त्यांनी घडविली आहेत. आजही सामाजिक कामात पूढे राहण्याची त्यांची धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे.

हेही वाचा-प्रविण दरेकर पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर -

केवळ कुटुंबाचा विचार न करता त्या खर्‍या अर्थाने समाजच्याही आई झाल्यात. त्यांनी कधीच वयाचा, लिंगाचा, जातीचा, धर्माचा किंवा ठिकाणाचा, भाषेचा भेद केला नाही. प्रत्येकाकडे माणूस म्हणूनच पाहीले व आपल्या या क्षमतेनुसार मदतच केली. सर्व प्रकारची नाती त्यांनी सांभाळली. माहेर, आजोळ, सासर तसेच दूरवरचे नाते संबंध असो, त्यानी सर्व नात्यांचे बंध आयुष्यभर जोपासलेत. स्वतःसाठी जगताना त्यांनी इतरांनाही जगण्याचा आनंद दिला. दुसर्‍यासाठी जगण्याच त्यांचं ब्रीद आज वयाच्या या टप्प्यातही त्या जपत आहेत.

मजुरी करणार्‍या कुटुंबाला दिली दिशा
वेंगुर्ले तालुक्यात काम करत असताना कर्नाटक राज्यातून मोलमजूरीसाठी आलेल्या एका भटक्या कुटूंबातील मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणून त्यांनी त्या कुटूंबाला प्रगतीच्या वाटेवर आणल. आज त्या कुटूंबातील प्रत्येक पिढीला शिक्षणाचा महासागर गवसला आहे. ज्या मुलाला त्यांनी शिकविले तो मुलगा सध्या एका कृषी विद्यापीठात प्राध्यापक आहे. त्याने नेहमीच आपल्या यशाचे श्रेय तेंडोलकर बाईंना दिले.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navratri festival special story by nilesh morjkar sindhudurg