राष्ट्रवादी, भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया ठप्प?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

चिपळूण - माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीस रामराम ठोकल्यानंतर ते भाजपमध्येच जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी सबुरीचे धोरण स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे.

चिपळूण - माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीस रामराम ठोकल्यानंतर ते भाजपमध्येच जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. दोन्ही पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी सबुरीचे धोरण स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे.

माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीस सोडचिठ्ठी दिल्यानंतर शहरात समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मेळावा संपल्यानंतर व्यासपीठावरील समर्थक पदाधिकाऱ्यांनीच जय भाजपचा नारा दिला. त्यामुळे माजी आमदार कदम भाजपमध्येच जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी तसेच भाजपकडून जिल्हा परिषद गटनिहाय बैठका झाल्या. यातून इच्छुक उमेदवारांची नावेही घेण्यात आली; मात्र दोन्ही पक्षांकडून अंतिम उमेदवारी जाहीर झाली नाही. कदमांनी राष्ट्रवादी सोडल्याने तालुक्‍यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. कदमांच्या बंडामुळे मजबूत स्थितीत असलेल्या गट व गणातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कदमांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर अंतिम उमेदवार कोण असेल, किती कदम समर्थकांना उमेदवारी मिळेल यावर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची नजर आहे. 

तालुक्‍यातील खेर्डी, पोफळी, अलोरे, रामपूर, सावर्डे गटात राष्ट्रवादीची मजबूत स्थिती होती; मात्र या विभागांतील काही पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेत प्रवेश केला. कदमांनी पक्षाला रामराम ठोकल्याने अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी आगामी निवडणुकीसाठी किती जणांना उमेदवारी मिळते याकडेही राष्ट्रवादीचे लक्ष आहे. 

कदमांच्या अटी मानणार का?
पाच महिन्यांपूर्वी माजी आमदार कदम यांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती. पालिका निवडणुकीत सत्ता मिळवून स्वतःची ताकद दाखविण्याची कदम यांची तयारी होती; मात्र पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पर्यायाने कदमांना मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. यामुळे या स्थितीला भाजपकडून कदमांच्या सर्वच मागण्या मान्य होतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. श्री. कदम यांच्यासोबत फारसे कार्यकर्ते जाणार नाहीत, यासाठी राष्ट्रवादीकडून कदम समर्थक पदाधिकाऱ्यांची मनधरणी सुरू आहे.

Web Title: ncp, bjp candidate selection process stop