राष्ट्रवादीचा सावंतवाडी मतदारसंघावरील दावा कायम 

राष्ट्रवादीचा सावंतवाडी मतदारसंघावरील दावा कायम 

कुडाळ - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी ही राहणारच आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचा हक्क राहील. तेथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पाठिशी पक्ष ताकद उभी करेल. कणकवलीतील जागेवरही पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठांकडे मागणी करणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले. आपल्या पक्षात नाराज स्वाभिमान कार्यकर्ते येतील असा दावासुद्धा त्यांनी केला. 

श्री सामंत म्हणाले, ""गेली वीस वर्षे मी राजकारणात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची स्थापना केल्यापासून ते आजतागायत या पक्षासोबत राहिलो आहे. श्री. पवार यांच्यासह पक्षाचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. तो विश्वास निश्‍चितच सार्थकी लावला जाईल. प्रत्येक ठिकाणी संघटना वाढवताना सर्वाना सोबत घेऊन काम करणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे, सुरेश दळवी, व्हिक्‍टर डान्टस, प्रसाद रेगे, सुरेश गवस या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सल्ल्यानुसार सर्वांना एकत्र येऊन पक्ष संघटना बांधणी करणार आहे. जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना खारेपाटण ते दोडामार्ग संपूर्ण दौरा करून संघटना वाढीसाठी निश्‍चितच प्रयत्न केले जाणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस सद्यस्थितीत विरोधी पक्ष भूमिकेत आहे. आता शिवसेना भाजपच्या विरोधात जनमत उभे करणे या गोष्टीला मी प्राधान्य देईल.'' 

ते म्हणाले, ""येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. तो आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पाठीशी नेहमीच राष्ट्रवादी-काँग्रेस राहील. आमचा हा लढा व्यक्तीशी नसेल तर प्रवृत्तीशी आहे. लवकरच सिंधुदुर्गात गाव तिथे राष्ट्रवादी हे अभियान राबवण्यात येणार आहे.'' 

श्री. सामंत म्हणाले, ""सध्या राज्यात कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचार प्रकरण गाजत आहे. सिंधुदुर्गात अशा प्रकारचा विषय असेल तर येथील शेतकऱ्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. याबाबत संबंधितांवर पोलिस यंत्रणेमार्फत तक्रार दाखल करून पुढील कार्यवाहीसाठी निश्‍चितच पावले उचलली जातील.'' 

नाराज स्वाभिमान कार्यकर्ते येतील 

श्री सामंत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, ""जिल्ह्यात संघटना वाढविताना काही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारीसुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येतील. स्वाभिमान पक्षाचे नाराज कार्यकर्ते आपल्या पक्षात येतील असा दावा या वेळी त्यांनी केला.'' 

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी सामंत यांची नियुक्ती झाली. यानंतर आज त्यांनी येथील लेमनग्रासमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, पक्षनिरीक्षक अर्चना घारे, राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, ज्येष्ठ पदाधिकारी सावळाराम अणावकर, वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, युवा नेते प्रफुल्ल सुद्रिक, भास्कर परब, आत्माराम ओटवणेकर, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष चित्रा बाबरदेसाई, अस्मिता तेली, धर्माजी बागकर, प्रसाद पोईपकर, अशोक कांदे, शिवाजी घोगळे, सचिन पाटकर, हार्दिक शिगले, संग्राम सावंत, योगेश कुबल, संतोष तळवणेकर, कृष्णा बिबवणेकर, चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते. 

"अच्छे दिन' दिसलेच नाहीत 
पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. के. गावडे म्हणाले, ""शिवसेना भाजप सरकारच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्हा दहा वर्षे विकासाच्या मागे गेला आहे. या सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही. हायवे, रस्ते, आरोग्यसेवा कोलमडलेल्या स्थितीत आहेत. अर्थसंकल्प झाला, पावसाळी अधिवेशन झाले. आता पंधरा दिवसात सरकार विकासाच्या घोषणा करू लागले आहेत. त्यांच्या घोषणा फसव्या आहेत. अच्छे दिन कधीच दिसलेच नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अमित सामंतच्या रुपात तरुण तडफदार अभ्यासू नेतृत्व लाभले आहे. अध्यक्ष पदाचा वापर ते निश्‍चितच पक्षसंघटना बरोबरच सर्वसामान्यांसाठी करतील.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com