विश्‍वासात न घेता राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदावरून मुक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

राजीनामा स्वखुशीने दिला असता
पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विश्‍वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. मी सात-आठ वर्षे कुडाळ तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणाने पदमोड करून पक्षाचे काम करत होतो. मला विश्‍वासात न घेता पदमुक्त केल्याचे वृत्तपत्रामधून समजले आहे. माझा राजीनामा मागितला असल्यास मी स्वखुशीने दिला असता. अलीकडे ओरोस येथे जिल्हा मेळावा झाला. त्यात कुडाळ तालुक्‍यात पक्षाचे चांगले काम केले म्हणून माझा हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. खासदार यांच्याकडील बैठक ही सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची होती व लाकूड व्यावसायिक होते, तरीही हा घेतलेला निर्णय अनाकलनीय असल्याचे यात म्हटले आहे.

कुडाळ- मला विश्‍वासात न घेता पदमुक्त करण्यात आले. राजीनामा मागितला असता तर मी स्वखुशीने दिला असता, असे पत्रकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी म्हटले आहे. खासदारांची भेटही सर्वपक्षीय व लाकूड व्यावसायिकांची होती, असेही यात म्हटले आहे.
पत्रकात श्री. बेळणेकर यांनी म्हटले आहे, की अलीकडे सिंधुदुर्ग लाकूड व्यावसायिक व शेतकरी यांची जिल्हास्तरीय बैठक झाली. झाडतोड व लाकूड व्यवसाय बंद झाल्यामुळे जिल्ह्याची बैठक आयोजित करून त्यात जिल्हा लाकूड व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात सर्वानुमते अध्यक्ष वासू पावसकर, उपाध्यक्ष अनिल हळदीवे व माझी निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेच्या माध्यमातून वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनरक्षक सावंतवाडी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन त्यांना व्यवसाय बंदच्या संदर्भात निवेदने देण्यात आली होती. त्याचप्रमाणे सर्वांच्यावतीने खासदार विनायक राऊत यांची तळगाव येथे भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये आमचे राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य माझे मित्र सतीश साळगावकरही होते. ते या संघटनेचे पदाधिकारी आहेत. खासदारांची भेट घेतल्यावर व चर्चा केल्यावर खासदारांनी सांगितले, की लवकरच याबाबत चर्चा करून जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे आमदार व उपवनरक्षक यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे एक बैठक लावून चर्चा करू व काय तो निर्णय घेऊ, असे सांगितले. वृत्तपत्रामधून कुडाळ तालुकाध्यक्षांना पदमुक्त केल्याची बातमी छापून आल्यामुळे मला आश्‍चर्याचा धक्काच बसला.

 

Web Title: ncp party politics